ईडीचा छापा हे तर बदनामीचे षड्यंत्र : हसन मुश्रीफ | पुढारी

ईडीचा छापा हे तर बदनामीचे षड्यंत्र : हसन मुश्रीफ

कागल; पुढारी वृत्तसेवा :  सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीसाठी 2009 ते 2012 या चार वर्षांमध्ये शेतकर्‍यांकडून शेअर भागभांडवलापोटी पैशाची उभारणी झाली आहे. माझ्या घरावर आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कार्यालयावर टाकलेल्या ईडीच्या छाप्यानंतर त्याच -त्या मुद्द्यावरून माझ्या बदनामीचेच रचलेले हे षड्यंत्र आहे, असा आरोप आ. हसन मुश्रीफ यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरावर इडीचा छापा हा तर पूर्णपणे राजकीय षड्यंत्राचाच भाग आहे. कारण, कारखान्याशी आर्थिक व कोणतेही संबंध नसतानासुद्धा त्यांच्या घरावर छापा पडला. ही गोष्टसुद्धा माझ्या जिव्हारी लागल्याचे सांगून आ. मुश्रीफ म्हणाले, आठवड्यापूर्वी माझ्या घरी तिसर्‍यांदा ईडीचा छापा पडला. या तिन्हीही केंद्रीय यंत्रणांचा तपास सुरू असून त्यांना आम्ही सहकार्य करीत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लेखापरीक्षण करणारे सरकारी लेखापरीक्षक आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जीएसटी आकारणीसाठी लागणार्‍या कर सल्लागार व चार्टर्ड अकाउंट यांना किती मानधन द्यावे, यामध्ये एकसूत्रीपणा आणा, अशी मागणी सरकारकडे केली होती. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या या मागणीनुसारच हा प्रस्ताव होता. किरीट सोमय्या यांनी तक्रार करण्याच्या आधीच दोन महिने ती निविदाही रद्द केली होती. या निविदेच्या माध्यमातून एक पैशाचाही व्यवहार झालेला नसताना मग घोटाळा झाला कसा, असा सवालही आ. मुश्रीफ यांनी केला. ग्रामपंचायतींच्या जीएसटी कर आकारणीसाठी आवश्यक कर सल्लागार व चार्टर्ड अकाऊंटची निविदा आणि बि—स्क कंपनीशी आपल्या जावयांचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे आ. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

माझे जीवन खुले पुस्तक

आ. मुश्रीफ म्हणाले, गेल्या 30-35 वर्षांचे माझे राजकीय आणि सामाजिक जीवन खुल्या पुस्तकाप्रमाणे जनतेसमोर आहे. माझी ही प्रतिमा जपण्यासाठी मी अव्याहतपणे जनतेची सेवा करीत आलो आहे. या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून लागेल ती किंमत मी मोजत असतो. आम्ही कोणतीही चुकीची कृती केलेली नाही. या सगळ्याचा तपास केंद्रीय यंत्रणा करीत आहेत. मात्र, ज्यावेळी पुन्हा माझ्या बदनामीचा विषय येईल, त्या प्रत्युत्तरादाखलच मी बोलेन.

Back to top button