कोल्हापूर : ‘गोकुळ’ माजी संचालकाच्या मुलाचा सीपीआरमध्ये धिंगाणा | पुढारी

कोल्हापूर : ‘गोकुळ’ माजी संचालकाच्या मुलाचा सीपीआरमध्ये धिंगाणा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सीपीआरमध्ये मद्यधुंद अवस्थेत उपचारासाठी आलेल्या गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने रविवारी पहाटे साडे चार वाजता अक्षरशः धिंगाणा घातला. डॉक्टरांसह कर्मचार्‍यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करून अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. पण सीपीआरधील डॉक्टरांसह कर्मचार्‍यांनी त्याला वेळीच ‘डोस’ दिला. उपचार सुरू असतानाच संबंधिताने सीपीआरमधून पलायण केले.

गोकुळच्या नामांकित माजी संचालकाचा मुलगा कुत्रे चावल्याने उपचारासाठी सीपीआरच्या अपघात विभागात आला होता. मद्यधुंद अवस्थेत असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक माहिती घेऊन उपचार सुरू केले. पण संबधिताने डॉक्टर, परिचारिकांना तुम्ही कोणते इंजेक्शन दिले, ते मला दाखवा. डॉक्टरांवर माझा विश्वास नाही असे म्हणत हुज्जत घातली. डॉक्टरांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला धड उभा राहता येत नव्हते. तरीही तो चक्क डॉक्टरांच्या खुर्चीत बसून डॉक्टरांना उपदेश करू लागला. सीपीआरमधील सुरक्षा रक्षकांनी संबंधिताला आवरण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तुम्ही मला गोळ्या घाला, पण या डॉक्टरांवर माझा विश्वास नाही असे सांगत त्याने आपला आवाज वाढविला. तसेच पत्नीला फोन करून बोलावून घेतले. डॉक्टरांनी अपघात विभागात प्राथमिक उपचार करून वॉर्डात दाखल केले.

यानंतर काही वेळाने डॉक्टर तपासणीसाठी गेले असताना संबंधित वॉर्डात नसल्याचे निदर्शनास आले. अन्य वॉर्डात शोध घेतला. पण संबंधित आढळून आला नाही. उपचाराची सर्व कागदपत्रे घेऊन त्याने सीपीआरमधून चक्क पलायन केले. ही बाब निदर्शनास येताच डॉक्टरांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सीपीआर प्रशासनाने संबंधित गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. सीपीआर परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

Back to top button