कोल्हापुरात आढळला गोंदन वृक्ष | पुढारी

कोल्हापुरात आढळला गोंदन वृक्ष

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहर परिसरातील वृक्षांचे सर्वेक्षण करताना वनस्पती अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे यांना मंगळवार पेठ येथील शाहू दयानंद हायस्कूलजवळ गोंदन वृक्ष आढळला असून तो शहरात एकमेव आहे. बोरॅजिनेसी अर्थात भोकर कुळातील वृक्ष असून भोकर, बुरगुंड, दहिवन यांचा सख्खा भाऊबंद आहे.

नैसर्गिकरीत्या गोंदनीचे वृक्ष भारत, श्रीलंका, चीन, तैवान, इंडोनेशिया, म्यानमार, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान आदी देशांत आणि महाराष्ट्रात अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, अकोला, नाशिक, उस्मानाबाद, पुणे व ठाणे येथे आढळतात. या वृक्षाला गुंदी, लैरी असे मराठी तर ग्रे लिव्हड सॉसरबेरी, नॅरो लिव्हड सेपिस्टन अशी इंग्रजी नावे आहेत. शास्त्रीय भाषेत कॉर्डिया सायनेन्सिस असे म्हणतात. याचे पूर्वीचे प्रचलित शास्त्रीय नाव कॉर्डिया गराफ असे आहे. याच्या फळांमध्ये डिंकासारखा चिकट पदार्थ (गोंद) असतो जो, पूर्वी डिंकाच्या कॅप्सूलप्रमाणे फळाला छिद्र पाडून वापरला जात असे, म्हणून गोंदन असे मराठी नाव आहे. हा छोटेखानी वृक्ष 5 ते 8 मीटर उंच वाढतो.

औषधी गुणधर्म

वृक्षाची साल स्तंभक गुणधर्माची आहे. ती मधुमेह, अल्सर, जखमा आणि क्षयरोग यावर गुणकारी आहे. फळे खाद्य असून त्याचे भोकरीप्रमाणे लोणचे बनवतात. फळ शक्तिवर्धक,बलवर्धक असून बद्धकोष्ठता, मूळव्याध, दातदुखी, ताप-खोकला, छातीत जंतू संसर्ग आणि पोटातील जंतावर उपयुक्त आहेत. लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे, फर्निचर, चालकाठ्या, खांब आणि जळणासाठी होतो.

Back to top button