कोल्हापूर : जोतिबा परिसर विकासासाठी प्राधिकरण; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा | पुढारी

कोल्हापूर : जोतिबा परिसर विकासासाठी प्राधिकरण; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जोतिबा मंदिर परिसरासह जोतिबा डोंगर व पायथ्याच्या 29 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव 25 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आ. विनय कोरे यांनी दिली.

जोतिबा मंदिर व परिसरातील विकासाबाबत प्राधिकरण स्थापन करण्यासाठी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हे आदेश देण्यात आले. यासंदर्भात विनय कोरे यांनी प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार ही बैठक झाली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकातून आठ ते दहा लाख भाविक
जोतिबा यात्रेला येतात. त्यांना सोयीसुविधा पुरविण्यात अडचणी येतात. शासनाने याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसंबंधितांशी या बैठकीत चर्चा करून जोतिबा मंदिर परिसर विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव येत्या 25 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करा, असे आदेश दिले.

यावेळी प्रधान सचिव राजगोपाल देवरा व विकास खारगे, विधी व न्याय विभागाचे सचिव नीरज धोटे, पुरातत्त्व विभागाचे मुंबई परिमंडळ अधीक्षक डॉ. राजेंद्र यादव, संचालक डॉ. तेजस गर्गे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने परिसर विकासाबाबत काय करता येईल, याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर 29 गावांचा आणि डोंगराचा विकास करण्याबाबत कोणती पावले टाकणे शक्य आहे, याचीही चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर उपमुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले आहेत. परिसरातील 29 गावांतील वन खात्याची जमीन व अन्य उपलब्ध सरकारी जमिनींवर विकासाच्या योजना राबविल्या जाणार आहेत. जोतिबा डोंगर व परिसरातील सात नैसर्गिक तलावांचे संवर्धन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे हरितपट्टे निर्माण करून जैवविविधता जोपासली जाणार आहे.

दर्शन मंडपासह विकासकामे

यापूर्वी दि. 14 मार्च 2017 साली आठ कामांचा एक विकास आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये दर्शन मंडप, सेंट्रल प्लाझा, स्वच्छतागृहे, भक्त निवास, सांडपाणी व्यवस्थापन व रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणीपुरवठा व सासनकाठ्यांच्या मिरवणुकीत अडथळा येऊ नये म्हणून भूमिगत विद्युतपुरवठा अशा कामांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुख्य मंदिराची दुरुस्ती, दर्शन रांग, गावातील रस्ते, पाण्याची पाईपलाईन व साठवण टाक्या, टॉयलेट कॉम्प्लेक्स, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक विद्युत व्यवस्था, तलावांचे संवर्धन, टेलिफोन कनेक्शन, दुकानगाळे हॉकर्स झोन व हॉटेल्स, शासकीय कार्यालये, बसस्टँड, पोलिसांच्या सुविधा, यात्री निवास, परिसर सुशोभीकरण यांचा समावेश आहे.

प्राधिकरण लवकरच : आ. कोरे

जोतिबा भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी आपण केली होती. सरकारने त्याला प्रतिसाद दिला आहे. हे प्राधिकरण लवकरात लवकर स्थापन होईल आणि विकासकामे गतीने होतील; यासाठी आपला पाठपुरावा असेल, अशी प्रतिक्रिया आ. विनय कोरे यांनी व्यक्त केली.

‘या’ गावांचा समावेश

वाडी रत्नागिरी, कुशिरे तर्फ ठाणे, कासारवाडी, शिये, वडणगे, जाखले, बहिरेवाडी, भुयेवाडी, भुये, जाफळे, केखले, पोखले, पोहाळे तर्फ आळते, माले, गिरोली, दाणेवाडी यासह 29 गावांचा विकास योजनेत समावेश करण्यात आला आहे.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या जोतिबा परिसरावरील कार्याचा आवर्जून उल्लेख

जोतिबा परिसर विकासासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना कोल्हापुरात बैठक घेऊन एक समिती स्थापन केली होती. परिसरातील विकासकामे लोकवर्गणीतून करण्याचे या बैठकीत ठरले. लोकवर्गणीतून ही कामे करण्यासाठी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यांनी लोकवर्गणीतून निधी जमा करून ही विकासकामे केली.

डोंगरावर अत्यंत अरुंद वाटेने भाविकांना जावे लागत होते. सासनकाठी व पालखी मिरवणूक याच मार्गाने जात होती. भाविकांची अडचण दूर करण्यासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी स्वतः पुढाकार घेऊन जोतिबा परिसर विकास समितीच्या माध्यमातून या पालखी मार्गाचे रुंदीकरण केले. तसेच मंदिराच्या आवारातील अडथळे दूर करून आवार प्रशस्त केले. त्याचबरोबर गायमुख तलाव व पुष्करणी कुंडाचे सुशोभीकरण, पाणीपुरवठा, सांडपाण्याची निर्गत, जोतिबा-पन्हाळा, केर्ले-कुशिरे-गिरोली-जोतिबा रस्त्यांची कामे करण्यात आली, याची माहितीही बैठकीत देण्यात आली. डॉ. जाधव यांच्या या उल्लेखनीय कार्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. विनय कोरे यांनी बैठकीत आवर्जून उल्लेख केला.

Back to top button