कोल्हापूर : सम्मेद शिखरजीसाठी जैन बांधवांचा विराट मूक मोर्चा | पुढारी

कोल्हापूर : सम्मेद शिखरजीसाठी जैन बांधवांचा विराट मूक मोर्चा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘एक जैन, लाख जैन’, ‘आपण सगळे एकत्र येऊया, शिखरजी तीर्थक्षेत्र वाचवूया’ असे फलक घेऊन सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र वाचविण्यासाठी एक लाखावर जैन बांधवांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. शहराच्या प्रमुख मार्गांवरून हा मूक मोर्चा निघाला. यावेळी जैन समाजाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या मोर्चात महिलांची संख्या मोठी होती. कोल्हापूर, सांगली, बेळगावमधील बांधव घरांना कुलूप लावून महिला, मुलांसह रस्त्यावर उतरले. या मोर्चाने शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली.

जैन समाजाचे सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून झारखंड सरकारने नुकतेच घोषित केले आहे. या पर्यटनस्थळामुळे येथे हॉटेल, बार, मत्स्यपालन व कुक्कुटपालनालाही परवानगी दिली आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्रावर मद्य आणि मांसाहार उपलब्ध करून देणारे रेस्टॉरंटस् उभे राहतील. यामुळे या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातील जैन बांधवांनी हे तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यास विरोध केला आहे.

कोल्हापुरातही या निर्णयाला विरोध

करण्यासाठी मंगळवारी मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी दहा वाजल्यापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागांतून तसेच शेजारच्या सांगली, बेळगाव जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात जैन बांधव महिला व मुलांसह दसरा चौकात दाखल होऊ लागले. दहा वाजताच दसरा चौक गर्दीने फुलून गेला.

अत्यंत शिस्तबद्ध मोर्चा

सकाळी अकरा वाजता मोर्चाची सुरुवात दसरा चौकातून झाली. शिस्तबद्ध पद्धतीने हा मूक मोर्चा सुरू झाला. दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी रोड, शिवाजी पुतळा, गुजरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, भाऊसिंगजी रोड, सीपीआर, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, असेम्ब्ली रोडने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

मोर्चातील सर्व आंदोलक येईपर्यंत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याचे थांबविण्यात आले. सर्व नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर प. पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य, महास्वामी परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे, राजू शेट्टी, माजी आमदार सुजित मिणचेकर, दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, भालचंद्र पाटील, अजित पाटील, संजय शेटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील, नाना गाट, जयश्री गाट, राजू लाटकर, राहुल चव्हाण, पद्माकर कापसे, अजित कोठारी आदींचा सहभाग होता. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.

कचराही केला गोळा

मोर्चात सहभागी लोकांनी कमालीची शिस्त पाळली. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि खाऊची रिकामी पाकिटे जैन बांधव एकत्रित करून लागलीच रिकाम्या पोत्यात भरून ठेवत होते. यासाठी स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे ही कामे करताना दिसले.

मौन आणि नमोकार मंत्र!

जिल्हाधिकारी ऑफिसजवळ मोर्चा पोहोचताच थोडा गोंधळ होत आहे, हे लक्षात येताच संयोजकांनी उपस्थितांना शांततेचे आवाहन केले. यावेळी तेथे शांतता राखण्यासाठी मौन धारण करण्याचे आवाहन करून नमोकार मंत्र वाचण्यात आला. त्यामुळे वातावरणात शांतता पसरली.

Back to top button