जग चिंतेत असताना भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट! | पुढारी

जग चिंतेत असताना भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट!

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढत असताना भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतामध्ये कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसते आहे. रविवारी संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे अवघे 173 रुग्ण आढळल्याने कोरोनावरील संकटाची संभाव्य भीती काही मैल दूर राहील, असे सुखावह चित्र सध्या तरी दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर सोमवारी सुधारित अधिकृत माहिती प्रसिद्ध केली. यानुसार देशात रविवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 265 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. सोमवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रुग्णसंख्या 173 पर्यंत खाली आली. सध्या देशामध्ये उपचारार्थी रुग्णसंख्या 2 हजार 670 इतकी असून त्याचे देशातील एकूण कोरोनाच्या संसर्गबाधित रुग्णांच्या तुलनेतील प्रमाण 0.01 टक्का आहे.

देशात कोरोनाने प्रवेश केल्यानंतर 7 ऑगस्ट 2020 ला कोरोनाबाधित रुग्णसंख्येने 20 लाखांचा टप्पा ओलांडला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये ही रुग्णसंख्या बघता बघता 1 कोटीचा टप्पा ओलांडून गेली. 4 मे 2021 व 23 जून 2021 मध्ये भारतीय कोरोना रुग्णसंख्येचा आलेख अनुक्रमे 2 व 3 कोटींचा टप्पा ओलांडून पुढे सरकला, तर जानेवारी 2022 मध्ये रुग्णसंख्या 4 कोटींचा टप्पा ओलांडून पुढे गेली.

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर देशामध्ये कोरोना लसीकरणाचे 220 कोटी 10 लाख डोस पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये बुस्टर डोसचाही समावेश आहे. देशातील बहुतेक नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले असले, तरी अवघ्या 27 टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

मृत्यूदर मर्यादित ठेवण्यात यश

कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या आढळाने रविवारपर्यंत देशात एकूण बाधित रुग्णसंख्या 4 कोटी 46 लाखांवर पोहोचली, तर कोरोना मृत्यूसंख्या 5 लाख 30 हजार 707 इतकी झाली आहे. या महामारीला 4 वर्षे पूर्ण होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी राहिला असताना कोरोनाचा उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णसंख्येची टक्केवारी 98.80 टक्क्यांवर गेली आहे, तर मृत्यू दर 1.19 टक्क्यांवर रोखण्यास भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्येच्या देशाला शक्य झाले आहे.

Back to top button