कोल्हापूर : अपघातांत महिलेसह शाळकरी मुलगा ठार | पुढारी

कोल्हापूर : अपघातांत महिलेसह शाळकरी मुलगा ठार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रंकाळा टॉवर, फुलेवाडी रिंगरोडसह केर्ली ( ता. करवीर) अशा तीन ठिकाणी शनिवारी झालेल्या अपघातांत महिलेसह शाळकरी मुलगा ठार, तर तिघेजण जखमी झाले. अनुराधा मिलिंद पोतदार (वय 40, रा.शेळके कॉलनी, फुलेवाडी) व लक्ष्मण धुळू डोईफोडे (14, गंधर्वनगरी, फुलेवाडी, रिंगरोड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर मिलिंद पोतदार (45), नीलेश दामोदर माने (37, नाचणी, जि. रत्नागिरी) यांच्यासह तिघांचा जखमींमध्ये समावेश आहे.

फुलेवाडी रिंगरोड येथील मिलिंद पोतदार हे पत्नी अनुराधा यांच्यासमवेत सकाळी दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत होते. पत्नी खासगी रुग्णालयात नोकरीला असल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी सोडून पती मिलिंद आपल्या कामाच्या ठिकाणी जाणार होते. रंकाळा टॉवर-जावळाचा गणपती मंदिरदरम्यान रोडवर जेसीबी मशिनच्या बकेटचा दुचाकीला जोरात धक्का लागल्याने पोतदार दाम्पत्य जमिनीवर कोसळले. त्यात दोघेही जखमी झाले. डोक्याला जोराचा मार लागल्याने अनुराधा गंभीर जखमी झाल्या. अतिरक्तस्त्रावामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीय, फुलेवाडीतील ग्रामस्थांनी गर्दी केली. या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.

दरम्यान, फुलेवाडी रिंगरोड परिसरात गंधर्वनगरी येथील लक्ष्मण धुळू डोईफोडे (वय 14) हा मुलगा दूध आणण्यासाठी दुचाकीवरून जात होता. गंधर्वनगरी स्वागत कमानीजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मणचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. डोईफोडे कुटुंबीय मूळचे ऐनी (ता. राधानगरी) येथील असून, फुलेवाडी परिसरात त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे.

आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलगा लक्ष्मण नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. हाता-तोंडाला आलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला धक्का बसला. लक्ष्मणच्या आईनेेकेलेला आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता. अपघातातील अन्य एका जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीपर्यंत त्याचे नाव समजू शकले नव्हते.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली येथे मोटारीची धडक बसून नीलेश दामोदर माने हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दुपारी चार वाजता ही घटना घडली. जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे.

Back to top button