कोल्हापूर : नववर्षाचे बेधुंद स्वागत | पुढारी

कोल्हापूर : नववर्षाचे बेधुंद स्वागत

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आसमंत उजळून टाकणारी रोषणाई, गर्दीने फुललेली उद्याने, संगीताच्या तालावर थिरकणारी पावले आणि मध्यरात्रीच्या ठोक्याला नववर्षाच्या स्वागतासाठी आनंदाने बेभान झालेली तरुणाई अशा जल्लोषी वातावरणात तमाम कोल्हापूरकरांनी तब्बल दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात नववर्षाचे स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करत, आनंदाची लयलूट करीत कोल्हापूरकरांनी सरत्या वर्षाला निरोप दिला. सेलिब्रेशन समारंभात सर्वच वयोगटातील लोकांचा सहभाग होता.

कोल्हापूर, पन्हाळा, तसेच परिसरातील फार्म हाऊस, हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले होते. गेली दोन वर्षे नवीन वर्षाचे स्वागत निर्बंध पाळून करण्यात आले. यंदा मात्र निर्बंधमुक्त वातावरणात नववर्ष स्वागताचा प्रचंड जल्लोष झाला. यावेळी पोलिस नियमांचे पालन करून सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. शहर व परिसरातील हॉटेल्सही विद्युत रोषणाईने सजवण्यात आली होती. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मटण, चिकनसह मासे खरेदीसाठी दुकानांमध्ये सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. महापालिकेने रात्री बारा वाजेपर्यंत सार्वजनिक बागा खुल्या ठेवल्याने नागरिकांची बागेतही गर्दी झाली होती. शहरातील धार्मिक स्थळांवर व काही सार्वजनिक इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मध्यरात्रीचा काऊंटडाऊन सुरू होता. 12 वाजण्याचा टोला पडताच अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील प्रमुख चौकात पोलिसांचा पहारा होता. शहरात येणार्‍या वाहनांची तपासणी केली जात होती.

Back to top button