कोल्हापूर : इथेनॉलमध्येही महाराष्ट्र अव्वल | पुढारी

कोल्हापूर : इथेनॉलमध्येही महाराष्ट्र अव्वल

राशिवडे, प्रवीण ढोणे : साखर उत्पादनापाठोपाठ महाराष्ट्र राज्याने इथेनॉलनिर्मितीमध्येही आघाडी घेतली आहे. राज्यात वार्षिक 268 कोटी लिटर क्षमतेचे इथेनॉल प्रकल्प उभारण्यात आले असून यामध्ये मोलॅसिसपासून तयार होणार्‍या इथेनॉल प्रकल्पांची संख्या 116 आहे. धान्यापासून तयार होणार्‍या इथेनॉल प्रकल्पांची संख्या 28 इतकी आहे.

केंद्र शासनाने सुविधाही प्राधान्यक्रमाने दिल्याने इथेनॉलनिर्मिती प्रकल्पात वाढ झाली आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्पांना जास्त पसंती दिल्याने दोन वर्षांमध्ये प्रकल्पांची संख्या लक्षणीय वाढली आहे व अजूनही ती वाढत आहे. गेल्या दोन वर्षांपासून केंद्राने सातत्याने इथेनॉलचे दर वाढविल्याने इथेनॉलनिर्मिती फायदेशीर ठरत आहे.

महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये इथेनॉल प्रकल्पांची संख्या 58 आहे. एकूण प्रकल्प क्षमता 208 कोटी लिटरची आहे. उत्तर प्रदेशाखालोखाल कर्नाटकात 118 कोटी लिटर क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सध्या मात्र साखर उत्पादनापाठोपाठ उतर प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्राने इथेनॉल निर्मितीमध्येही बाजी मारली आहे.

राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2018 अंतर्गत वेगवेगळ्या पिकांपासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये भात, मक्का, खराब झालेला तांदूळ, गहू आदींचा समावेश आहे. नुकतीच इथेनॉलवरील जीएसटी पाच टक्क्यांपर्यंत घटविला आहे. ‘इथेनॉल इंटरेस्ट सबवेंशन’ अंतर्गतदेखील आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.

भारताची इथेनॉलनिर्मिती प्रकल्पांची क्षमता 947 कोटी लिटर इतकी झाली आहे. यामध्ये 263 प्रकल्प मोलॅसिसवर, 123 प्रकल्प धान्यावर आधारित आहेत. मोलॅसिसवर आधारित इथेनॉल प्रकल्पाची क्षमता 619 कोटी, तर धान्यावर आधारित प्रकल्पांची क्षमता 328 कोटी लिटर इतकी आहे.

Back to top button