कोल्हापूर मनपासाठी तीन सदस्यीय प्रभाग | पुढारी

कोल्हापूर मनपासाठी तीन सदस्यीय प्रभाग

मुंबई / कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिकांत तीन सदस्यीय प्रभागरचना पद्धतीनुसार आगामी निवडणुका घेतल्या जातील. कोल्हापूरसह पंधरा महापालिकांची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार आहे. मुंबई महानगरपालिकेत आणि राज्यातील नगरपंचायतींमध्ये ‘एक वॉर्ड, एक नगरसेवक’ पद्धतीने, तर नगर परिषदांमध्ये दोन सदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. दरम्यान, प्रभागरचना निश्चित झाल्याने कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी दुपारी पार पडली. यामध्ये राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदांमध्ये बहुसदस्यीय (दोन किंवा अधिक) प्रभाग पद्धतपुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी तातडीने पाठविण्याचा निर्णय झाला.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिकनगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करून, महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर 2019 मध्ये राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेली आरोग्यविषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणलेली वस्तुस्थिती, यामुळे नागरी समस्यांचे निराकरण, जबाबदारी पार पाडणे हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वामुळे (बहुसदस्यीय प्रभाग पद्धती) अधिक योग्य पद्धतीने होऊ शकते, या बाबी विचारात घेऊन महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य; परंतु दोनपेक्षा कमी नाहीत व चारपेक्षा अधिक नाहीत इतकी सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

तीन सदस्यीय पद्धतीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आग्रही

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रभागरचना पद्धत असावी, अशी शिवसेनेची भूमिका होती. त्यानुसार शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी नगरपालिकांत दोन सदस्यीय, तर महानगरपालिकांत चार सदस्यीय प्रभाग पद्धत रचनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विशेषतः काँग्रेसने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीला कडाडून विरोध केल्याने तीन सदस्य पद्धत करण्यावर तडजोड करण्यात आली.

काँग्रेसला ‘एक वॉर्ड, एक नगरसेवक’ पद्धत हवी होती, तर राष्ट्रवादीला द्विसदस्यीय प्रभाग पद्धत सोयीची वाटत होती. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी निश्चित असल्याने राष्ट्रवादीने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीला मूक संमती दिली होती. मात्र, काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याने त्यांना ‘एक वॉर्ड, एक नगरसेवक’ प्रभाग पद्धत हवी होती.

याबाबत एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून चार सदस्यीय प्रभागरचना पद्धतीला पाठिंबा देण्याची विनंती केली. मात्र, काँग्रेसने याला शेवटपर्यंत संमती न दिल्याने अखेर तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार व महाविकास आघाडी म्हणून एकमेकांना विश्वासात घेऊन निवडणुका घेण्याचे निश्चित झाले. त्यानंतरच तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब झाले.

2022 वर्ष निवडणुकांचे…

नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर या 5 महापालिकांची मुदत 2020 मध्येच संपली. सध्या तेथे प्रशासक कारभार पाहत आहेत.

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर या 10 महापालिकांची मुदत फेब्रुवारी 2022 मध्ये संपणार आहे.

96 नगरपरिषदा/नगरपंचायतींची मुदत 2020 मध्येच संपली आहे. तर फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण 200 हून अधिक नगरपंचायती व नगर परिषदांची मुदत संपणार आहे.

27 जिल्हा परिषद आणि 300 हून अधिक पंचायत समित्यांसाठी फेब्रुवारीमध्ये निवडणूक होईल.

Back to top button