कोल्हापूर : जिल्ह्यात दहशत फोफावतेय | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यात दहशत फोफावतेय

कोल्हापूर ; दिलीप भिसे : जिल्ह्यात फुटकळ गुंडांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. क्षुल्लक कारणातूनही भरचौकात नंग्या तलवारी, चाकू, कोयत्यासारख्या घातक शस्त्रांचा वापर होऊ लागला आहे. दि. 1 डिसेंबरपासून दि. 25 अखेर 72 पेक्षा जादा हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. उपनगरांसह ग्रामीण भागातही हे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. गुंडांवर कायद्याचा धाक आहे की नाही, असा सवाल व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस दलाने पोलिस रेकॉर्डवरील तसेच राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या साडेचारशेवर गुंडांना तडीपार, तीनशेवर समाजकंटकांवर प्रतिबंध कारवाईचा बडगा उगारला खरा; पण फुटकळ समाजकंटकांनी धारदार शस्त्रांच्या धाकावर दहशत निर्माण करून पोलिस यंत्रणांना आव्हान दिले आहे.

तडीपारी कागदावरच!

ग्रामपंचायत निवडणूक काळात सुमारे साडेचारशेवर समाजकंटकांना तात्पुरत्या काळासाठी तडीपार करण्यात आले होते. प्रत्यक्षात बहुतांश समाजकंटक ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत सक्रिय होते. प्रांताधिकार्‍यांनी सराईतांना या काळात अटक केली. अतुल यशवंत खडके, करण किशोर दणाणेसह 5 संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
गुंडांना पोसणार्‍या टोळ्या कार्यरत

मनपाची निवडणूक तोंडावर आहे. राजकीय साठमारीसाठी काही व्हाईट कॉलर समाजकंटकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. ‘मोका’ अंतर्गत कारवाई झालेल्या म्होरक्यांनी प्रभागात संपर्क वाढविला आहे. कळत न कळत पोलिस रेकॉर्डवर आलेल्या 17 ते 20 वयोगटातील पोरांना हाताशी धरून फिल्डिंग लावली आहे. अमली पदार्थ, जेवणावळीसह दारूचा रतीबच लावल्याचे दिसते.

Back to top button