कोल्हापूर : ग्रामपंचायत लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट; माघारीसाठी रात्रभर खलबते | पुढारी

कोल्हापूर : ग्रामपंचायत लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट; माघारीसाठी रात्रभर खलबते

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत बुधवारी (दि.७) दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यामुळे माघारीसाठी मंगळवारी रात्रभर खलबते सुरू होती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काही कार्यकर्ते फोन बंद करून गायब झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. छाननीनंतर सरपंचपदासाठी २ हजार ६५४, तर सदस्यपदासाठी १६ हजार ३५६ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. माघार घेण्यासाठी बुधवारी तीन वाजेपर्यंत मुदत असल्यामुळे माघारीसाठी मंगळवारी ! रात्रभर फिल्डिंग लावण्यात येत होती. कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्यामुळे ‘आता नाही तर कधी नाही’ या भूमिकेतून प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर निवडणुकीची तयारी केली असल्याने नेत्यांचे देखील ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळेच एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त एकत्र येऊन अनेक ठिकाणी आघाडी करताना दिसत आहेत.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या या भूमिकेकडे नेत्यांनीदेखील दुर्लक्ष केले आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

Back to top button