इचलकरंजी ग्रामपंचायत निवडणूक : निष्ठावंताना कात्रजचा घाट..! | पुढारी

इचलकरंजी ग्रामपंचायत निवडणूक : निष्ठावंताना कात्रजचा घाट..!

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : उमेदवारीसाठी जातीच गणित आणि खर्च करण्याची तयारी हा निकष प्रभावी ठरल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक निष्ठावंताना कात्रजचा घाट दाखवण्यात आला आहे. या नाराजीतूनच सामान्य कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकल्याने गावागावातील नेत्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे नाराजी दूर करुन माघार घेण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागत आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा ते संसदेपर्यंत मजल मारलेल्या जिल्ह्यातील बहुतांशी नेत्यांची सुरवात ग्रामपंचायतीच्या राजकारणापासूनच झालेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्व असते.

राजकीय करिअरला सुरूवात करण्यासाठी ग्रामपंचायत चांगला प्लॅटफॉर्म आहे. विशेषत: युवक वर्ग या निवडणुकीकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो. भविष्यातील राजकारणात नेतृत्व करण्याची संधी मिळेल या अपेक्षेने गटासाठी पडेल ती जबाबदारी एकनिष्ठपणे सांभाळत निवडणुकीत पळत असतो. मात्र, ऐन निवडणुकीत उमेदवारी देताना एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे नाव गायब होते. काही गावात विशेष मर्जीतील पण ‘हो ला हो’ म्हणणार्‍यांना उमेदवारी देण्यासाठी तर ‘याल कोण ओळखतयं’ असे वातावरण करुन निष्ठावंतांचे पंख छाटण्यात आल्याचे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयाला मिळत आहे.

अर्ज माघारी घेण्यासाठी दबावतंत्र

नेत्यांनी लावलेल्या जाती, आर्थिक निकषास पात्र ठरत नसल्याची खात्री झाल्याने अनेक युवक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काहीही होवो निवडणूक लढवायचीच, ताकद आजमावण्याची असा निर्धार या निवडणुकीच्या माध्यमातून गावा-गावात होत आहे. नातेवाईक, मित्र यांच्यामार्फत अर्ज माघारी घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही गावात तर माघारीसाठी दबावतंत्राचाही वापर सुरु झाला आहे.

ग्रामपंचायती ४४७, उमेदवारी अर्ज १९३९३

जिल्ह्यात सध्या ४७४ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. सरपंच पदासाठी २७०२ तर सदस्यपदासाठी १६,६९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ही आकडेवारी पाहता उमेदवारी डावललेच्या रागातून उच्चांकी अर्ज दाखल झाल्याचे दिसते. यामध्ये युवकांची संख्य उल्लेखनिय आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button