कोल्हापूर-रत्नागिरी चौपदरीकरणातील अडथळे दूर | पुढारी

कोल्हापूर-रत्नागिरी चौपदरीकरणातील अडथळे दूर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेली पाच वर्षे रखडलेले कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादनासह सर्व अडथळे दूर झाले आहेत. हे काम यंदा मार्गी लागणार आहे. ठेकेदारही नियुक्त झाला आहे. डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण मंजूर झाले आहे. त्यासाठी 2 हजार 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. एकूण 134 कि.मी. रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता 667.13 हेक्टर जमीन आवश्यक आहे. यापैकी बहुतांश जमीन संपादित करण्यात आली आहे. हा महामार्ग पूर्वी शहरातून जात होता. आता केर्ली बायपास काढण्यात आला आहे. केर्ली-शिये-चोकाकमार्गे रत्नागिरी-नागपूर या महामार्गास जोडला जाणार आहे.

रत्नागिरी ते आंबा या अंतरातील भूसंपादन यापूर्वीच पूर्ण झाले आहे. आंबा ते चोकाक या मार्गातील भूसंपादनासाठी काम थांबले होते. आता या मार्गातील भूसंपादनही पूर्ण झाल्याने चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आंबा ते पैजारवाडी या 45 कि.मी. अंतरातील चौपदरीकरणासाठी 170 हेक्टर जमीन आवश्यक असून, केवळ 148 हेक्टर ताब्यात आहे. उर्वरित 20.72 हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे.

पैजारवाडी ते चोकाक या 34 कि.मी. अंतरातील चौपदरीकरणासाठी तब्बल 162.67 हेक्टर जमीन लागणार असून, केवळ 147 हेक्टर ताब्यात आहे. 15.67 हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पैजारवाडी ते चोकाक या अंतरातील केर्ली बायपास या अंतरात भूसंपादनाचा प्रश्न बिकट बनला होता. अखेर या मार्गातील जमीन संपादनाची प्रक्रियाही मार्गी लागली आहे.

यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय सोलापुरात होते. तेव्हा या प्रकल्पाला फारशी गती मिळाली नाही. तथापि, दोन वर्षांत हे कार्यालय कोल्हापुरात आले. पहिल्या टप्प्यात फारसे प्रयत्न झाले नाहीत. मात्र, त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यांद्वारे महामार्ग चौपदरीकरण मार्गी लागले आहे.

या दोन्ही कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुमारे 12 ते 13 टक्के कमी दराने ठेकेदारांनी निविदा भरल्या असून, त्या मंजूर झाल्या आहेत. या कामांसाठी सुमारे 10 ते 12 ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. यापैकी कमी दराने आलेल्या निविदा स्वीकारण्यात आल्या आहेत. आता काम मंजूर झालेल्या ठेकेदारांची वित्तीय परिस्थिती आणि बँक व्यवहार तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ठेकेदारांची वित्तीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर तत्काळ वर्कऑर्डर दिली जाणार आहे. नोव्हेंबरअखेर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.

ठिकठिकाणी भुयारी मार्ग, ओव्हरपास व उड्डाणपूल

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ठिकठिकाणी 4 ते साडेपाच मीटरचे भुयारी मार्ग, तर काही ठिकाणी ओव्हरपास तयार करण्यात येणार आहेत. ओव्हरपासच्या ठिकाणी महामार्ग पुलाखालून जाणार असून, स्थानिक रस्ता पुलावरून जाणार आहे. बांबवडे हा बायपास असून, येथे दोन ठिकाणी भुयारी मार्ग आणि बॉक्स ब्रिजचेही नियोजन आहे. मलकापूर बायपास असून, त्या ठिकाणी मध्यम आकाराचा भुयारी मार्ग आहे. पैजारवाडी, निळे येथे ओव्हरपास तयार करण्यात येणार आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरील कणेरी ओव्हरपासप्रमाणे बांधण्यात येणार आहे. मलकापूर येथे दोन ठिकाणी ओव्हरपास तयार केले जाणार आहेत. जुळेवाडी खिंड येथेही ओव्हरपास आहे. कोल्हापूर बायपास केर्ली येथे भुयारी मार्ग, भुयेवाडी, शिये, मौजे वडगाव येथे मोठ्या आकाराचा भुयारी मार्ग असणार आहे. वाघबीळ आणि बोरपाडळे येथे पूल (व्हायडक्ट) बांधण्याचे नियोजन आहे. तसेच चौकाक येथे साडेपाच मीटरचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

आंबा ते चोकाक मार्ग झाला निश्चित : पंदरकर

या महामार्गासाठी आंबा ते चोकाक हा मार्ग निश्चित केला आहे. या मार्गातील गावातील भूसंपादन बहुतांश पूर्ण झाले आहे. लवकच वर्कऑर्डर मिळून काम सुरू होईल. हाच मार्ग अंतिम असेल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी सांगितले.

या गावांतून जाणार महामार्ग…

शाहूवाडी तालुक्यातील आंबा, तळेवडे, केर्ले, चांदोली, चनवाड, वारूळ, वालूर, निळे, करुंगळे, येलूर, जाधववाडी, कडवे, पेरिड, भैरेवाडी, कोपार्डे, ससेगाव, करंजोशी, सावे, गोगवे, बांबवडे, वाडीचरण, चरण, डोणोली, खुटाळवाडी; पन्हाळा तालुक्यातील आवळी, देवाळे, नावली, बोरपाडळे, नेबापूर, अंबवडे, पिंपळे-सुर्वे, दानेवाडी, कुशिरे; करवीर तालुक्यातील केर्ले, पडवळवाडी, केर्ली, भुयेवाडी, भुये, जठारवाडी, शिये; तर हातकणंगले तालुक्यातील टोप, नागाव, वडगाव, हेर्ले, माले आणि चोकाक.

Back to top button