कोल्हापूर : मंदिर, गोशाळांबद्दल पवारांना द्वेष का? – पालकमंत्री दीपक केसरकर | पुढारी

कोल्हापूर : मंदिर, गोशाळांबद्दल पवारांना द्वेष का? - पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  आम्ही हिंदुत्व दडून करत नाही. आमचं हिंदुत्व उघड उघड आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहे, शरद पवार कधीही मंदिरात जात नाहीत. त्यांना गो शाळेविषयी किती आत्मीयता आहे, हे आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला गोशाळेविषयी आत्मीयता आहे. म्हणूनच शिर्डी दौर्‍यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोशाळेला भेट दिली. मग त्यांना जोतिषाला हात दाखवायला गेलेत का? अशी जोड देणे याच्यासारखी दुर्दैवी बाब कोणतीही नाही. गोशाळा आणि मंदिरांबद्दल पवार यांना द्वेश का? अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. गुरुवारी शाहू मिलसह परिसराची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘शरद पवार यांनी पंढरपूर मंदिरासह अनेक मंदिरांचा कायापालट केला आहे. पवार तर माझे नेते असून ते आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याविषयी मी काहीच बोलणार नाही, पण जेव्हा राजकीय विधान ते करतील त्याला चोख उत्तर आम्ही देणारच. मंदिरात जाणे हा काय गुन्हा आहे का? त्यांना धर्माच्या नावाखाली मते मिळवायची असतात. आम्हाला मंदिरात जाताना कोणताही कमीपणा वाटत नाही. महाराष्ट्रातील मंदिरे वैभव आहेत. त्यासाठी जे-जे काही कराय लागेल ते आम्ही करणार. मग आमच्यावर कितीही टीका झाली तरी काही हरकत नाही. ज्योतिषी ही भारताची परंपरा आहे ती जपली पाहिजे. त्यांना मान मिळाला पाहिजे. ही भूमिका नाही ठेवली तर आम्ही हिंदू संस्कृतीबद्दल काय बोलायचेे.’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोशाळेला मदत केली होती. ज्यांना ही मदत केली, त्यांनी अपेक्षा केली की, शिर्डीला आल्यानंतर गोशाळेला भेट द्या. तेथील महादेव मंदिराचे दर्शन घ्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिर्डीजवळील गोशाळेला भेट दिली. त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार टीका करत आहेत. हे चुकीचे असल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

राजर्षी शाहू महाराजांनी दूरद़ृष्टी ठेवून अनेक उद्योग येथे उभा केले होते. शाहू मिलमध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. शाहू मिलच्या मोकळ्या जागेत राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक उभा करता येईल. पर्यटकांसाठी ते भारतातील आकर्षण ठरेल. केवळ पर्यटकांसाठी नव्हे तर ज्यांना स्किल डेव्हलपमेंट करायचे आहे. त्यांच्यासाठी ते वरदान ठरले पाहिले. अशी डेव्हलमेंट येथे केली जाणार आहे. येथे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कन्व्हेन्शन सेंटर झाले तर आंतरराष्ट्रीय परिषदा येथे होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. कामाख्यादेवी शक्तिपीठांपैकी एक आहे. तिच्या दर्शनामुळे आमचे सरकार आले आहे. कामाख्यादेवी दुष्टांचा नाश करण्यासाठी आहे. देवीच्या आशीर्वादामुळेच चुकीच्या प्रकारचे सरकार बाहेर घालवू शकलो. तेथे आमची श्रद्धा आहे तेथे आम्ही जाणार, असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे आदी उपस्थित होते. यानंतर पालकमंत्री केसरकर यांनी क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्क परिसरातील जागेची पाहणी केली.

कोल्हापूर जयपूरएवढेच सुंदर

शिवाजी पूल परिसर ऐतिहासिक परिसर आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या परिसराचा विकास झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे पूल परिसराची पाहणी केली. शहरातील तालमींना भेटी दिल्या. श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन या परिसराची पाहणी केली. येथील अनेक कार्यालयांचे स्थलांतरण सुरू आहे. यानंतर तो परिसर वेगळ्या वैभवाने उजळून निघेल. कोल्हापूर जयपूरएवढेच सुंदर असून ते संपूर्ण भारतासमोर गेले पाहिजे, अशी इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा लोकांपर्यंत गेला पाहिजे. पण येथील विकास करताना ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

Back to top button