कोल्हापूर : शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडले; कर्नाटकच्या गुळाची आवक बंद | पुढारी

कोल्हापूर : शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडले; कर्नाटकच्या गुळाची आवक बंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुळापेक्षा कर्नाटकच्या गुळाला जास्त भाव मिळत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी मंगळवारी शाहू मार्केट यार्डात गूळ सौदे बंद पाडले. यानंतर शेतकरी, अडते, व्यापारी यांच्या बैठकीत कर्नाटकच्या गुळाची आवक बुधवार (दि. 23) पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, सौदे बंदमुळे गुळाची सव्वा कोटीची उलाढाल थांबली.

यार्डात मंगळवारी 54 गाड्यांतून गुळाची आवक झाली होती. सकाळी आठ वाजता गूळ सौदे सुरू झाले. पहिल्या गाडीतील गुळाला 3 हजार 500 ते 3 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल दर आला. त्याचवेळी कर्नाटकातील गुळाला मात्र 3 हजार 700 रुपये दर आला होता. ही बाब शेतकर्‍यांच्या निदर्शनास येताच कोल्हापूर जिल्ह्यातून गूळ घेऊन आलेले शेतकरी आक्रमक झाले. कर्नाटकातील गुळाला आपल्यापेक्षा जादा दर मिळत असेल; तर आम्ही कमी किमतीत गूळ विकणार नाही, असा पवित्रा घेत शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडले.

सौदे बंद पडताच बाजार समितीचे प्रशासक प्रकाश जगताप, सचिव जयवंत पाटील, उपसचिव के. बी. पाटील तेथे आले. त्यांनी गूळ दराबाबत असलेल्या फरकाची माहिती घेतली. त्यानंतर शेतकरी, अडते, व्यापारी यांची बाजार समितीच्या कार्यालयात प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

कोल्हापूरच्या गुळाला सर्वत्र चांगली मागणी आहे. त्यामुळे अनेक व्यापारी कर्नाटकचा गूळ कोल्हापुरात आणून त्याची कोल्हापूरच्या नावावर विक्री करतात. त्याला दर जास्त मिळतो, स्थानिक कोल्हापुरी गुळाला मात्र दर मिळत नाही, याची बाजार समितीने चौकशी करावी, अशी मागणी तळाशीचे गूळ उत्पादक विजय जाधव यांनी केली.

गेल्या हंगामात कर्नाटकातील गूळ न आणण्याचा निर्णय झाला असताना, यावर्षी कर्नाटकचा गूळ पुन्हा मार्केट यार्डात कसा आला? असा सवाल राजेंद्र वडगावे यांनी केला.गूळ व्यापार्‍यांनी कर्नाटकात जाऊन गूळ खरेदी करावा; पण तो कोल्हापूर मार्केटमध्ये आणू नये, अशी मागणी विनय पाटील यांनी केली. त्यानुसार प्रशासकांनी व्यापारी, अडते यांच्याशी चर्चा केली. बैठकीत बुधवारपासून कर्नाटकातील गुळाची मार्केट यार्डात आवक करायची नाही, असा निर्णय जाहीर केला. हा निर्णय सर्व व्यापार्‍यांनीही मान्य केला आहे.

Back to top button