कोल्हापूर ‘खड्ड्यात’च : रस्‍त्‍यांची प्रचंड दुर्दशा, पॅचवर्कचे केवळ वडाप! | पुढारी

कोल्हापूर ‘खड्ड्यात’च : रस्‍त्‍यांची प्रचंड दुर्दशा, पॅचवर्कचे केवळ वडाप!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरात प्रवेश केल्यापासून ते अगदी गल्लीबोळापर्यंत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. काही प्रमुख मार्गांची अवस्था पाहिल्यास रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न शहरवासीयांना पडत आहे. शहरात येणार्‍या पर्यटकांना हे शहर आहे का? असा प्रश्न पडावा, इतकी रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. खड्डे मुजवण्याच्या आणि पॅचवर्कच्या नावाखाली काही कोटी रुपये खर्च होतात. मात्र कामाच्या निकृष्ट दर्जामुळे पालथ्या घड्यावर पाणी असे चित्र आहे. आंदोलने झाली, पाठपुरवाठा झाला तरी शहराच्या रस्त्यांची अवस्था काय आहे, हे पाहायला ना अधिकार्‍यांना वेळ आहे, ना लोकप्रतिनिधींना सवड आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे कोल्हापूरकरांना काव आणला आहे.

…या मार्गावरून दुचाकी चालवूनच दाखवा

* शिवाजी चौक ते पापाची तिकटीकडे जाणारा रस्ता
* पापाची तिकटी ते महापालिका माळकर तिकटी चौक
* आझाद चौक ते उमा चित्रमंदिर
* स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर ते वायल्डर मेमोरियल चर्च
* बाबूजमाल रोड ते जोतिबा रोड
* शिवाजी पेठ, जुन्या बलभीम बँकेसमोरील रस्ता
* राजारामपुरीतील अंतर्गत रस्ते

हाडे अन् वाहने खिळखिळी

अनेक ठिकाणी छोटे-मोठे खड्डे आहेत; तर काही मार्गावर केवळ खडी टाकून केलेले निकृष्ट पॅचवर्क आहे. त्यामुळे या खडतर मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना, विशेषत: दुचाकी चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. या खड्ड्यांमुळे हाडांचे रुग्ण वाढत आहेत आणि वाहनेदेखील खिळखिळी होत आहे. काहींना तर कंबरदुखी व मणक्याचे आजार जडले आहेत. पण याकडे लक्ष कोण देणार?

पॅचवर्क ठरतेय डोकेदुखी

मनपाच्या वतीने काही रस्त्यांचे पॅचवर्कचे काम केले आहे. मात्र रस्ता दुरुस्तीनंतर पसरलेली लहान खडी दुचाकी चालकांसाठी डोकेदुखी बनली आहे. खडीमुळे धुरळ्याचे प्रमाण वाढले असून वाहन घसरून अपघातांमध्येही वाढ झाली आहे. पापाची तिकटी ते महापालिका तसेच कॉमर्स कॉलेज ते उमा चित्रमंदिर परिसरातील रसत्यावर खडी टाकून केलेले पॅचवर्क नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.

Back to top button