कोल्हापूर : जुगारअड्ड्यावर छापा; 28 अटकेत | पुढारी

कोल्हापूर : जुगारअड्ड्यावर छापा; 28 अटकेत

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-सांगली रोडवर मध्य वस्तीत स्किल गेम नावाखाली रात्रंदिवस बेधडक चालणार्‍या जुगारअड्ड्यावर ‘एलसीबी’ने छापा टाकून अड्डामालकांसह 28 जुगार्‍यांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये 73 हजारांची रोकड, दुचाकी, चारचाकी वाहने, मोबाईल, असा सुमारे 13 लाख 51 हजारांचा मुद्देमालही जप्त केला.

अड्डामालक नितीन मुकुंद पवार (वय 39, रा. गल्ली क्रमांक 4, जयसिंगपूर), हरिबा संभाजी मोहिते (40, रा. राजीव गांधीनगर, जयसिंगपूर), जागामालक रोहित शिवाजी जाधव (रा. जयसिंगपूर) यांचा अटक केलेल्यांत समावेश असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे : उत्तम तुकाराम ओमासे (रा. बेडग, ता. मिरज), सुरेश आसुदामन खत्री (रा. शामरावनगर, सांगली), शंकर गुंडा पाटील (रा. धरणगुत्ती, शिरोळ), गोविंद दुर्गाप्पा वरगंडे (रा. जयसिंगपूर), कुमार रामचंद्र सूर्यवंशी (रा. बेडग, मिरज), नुरखाँ मुरादखाँ पठाण (रा. गुरुवार पेठ, मिरज), अभय गुलाबचंद शहा (रा. जयसिंगपूर), गुराप्पा सिद्राम हडपद (रा. जयसिंगपूर), आनंदराव धोंडिराम माळी (रा. जयसिंगपूर), पोपट बाबुसिंग रजपूत (रा. जयसिंगपूर), महेश गोविंद पवार (रा. जयसिंगपूर), अशोक धनंजय शेट्टी (रा. सांगली), किरण विजय पाटील (रा. जयसिंगपूर), सुकुमार भूपाल वठारे (रा. जयसिंगपूर), अमर मारुती साळुंखे (रा. जयसिंगपूर), राकेश दामाजी कामत (रा. शिरोळ), सुनील आकाराम चव्हाण (रा. जयसिंगपूर), राजेंद्र मारुती जाधव (रा. जयसिंगपूर), आकाश परशुराम कुराडे ऊर्फ पवार (रा. जयसिंगपूर), बाबू हणमंत पवार (रा. शाहूनगर), दशरथ गणपत गाडीवडर (रा. चिपरी, ता. शिरोळ), मोहन गजानन गडकर (रा. सांगली), संदीप बाळूसिंग रजपूत (रा. सांगली), चिंतामणी बाबासाहेब पाटील, (रा. सांगली), राजेंद्र रामचंद्र हडकळ (रा. सांगली).

स्किल गेम नव्हे, जुगार

कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील जनतारा हायस्कूलजवळ रोहित जाधव याच्या जागेत वेलकम कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (दत्तवाड) मार्फत स्किल गेमच्या नावाखाली काही दिवसांपासून तीन पानी जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. त्यांनी पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांना छापा टाकून कारवाईचे आदेश दिले. विशेष पथकात शेष मोरे, हरिश पाटील, विनायक चौगुले, विलास किरोळेकर, अनिल पास्ते, नामदेव यादव यांचाही समावेश होता.

पोलिस अधीक्षकांकडून गंभीर दखल

जिल्ह्यातील मटका, जुगारासह तस्करी टोळ्यांविरुद्ध कारवाईच्या सक्त सूचना असतानाही जयसिंगपूर व शिरोळ परिसरात काळ्याधंद्यांना ऊत आला आहे. जयसिंगपूर परिसरात मध्यवस्तीत सुरू असलेल्या जुगारीअड्ड्यावर ‘एलसीबी’च्या कारवाईची पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जयसिंगपूर पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने लवकरच प्रभारी अधिकार्‍यांसह संबंधित पोलिसांवर कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Back to top button