लाल मिरचीच्या दरवाढीचा ठसका | पुढारी

लाल मिरचीच्या दरवाढीचा ठसका

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गव्हाच्या पाठोपाठ सर्वसामान्यांच्या जेवणात महत्त्वाचा घटक असलेल्या मिरचीच्या दरात मागील वर्षीच्या दुप्पट वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा उत्पादन घटण्याची शक्यता असून त्यातच नव्या मालाची आवक कमी आणि बाजारपेठेतील जुना माल संपत आल्याने लाल मिरचीच्या दरवाढीचा ठसका सर्वसामान्यांना लागणार आहे.

सर्वसामान्य माणसाच्या जेवणातील महत्त्वपूर्ण असलेल्या चटणीचा भाव वाढणार आहे. दिवाळीनंतर लाल मिरचीच्या बाजारात चांगलीच तेजी आली आहे. हा दर मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट असून मिरचीचे हे दर पुढेही कायम राहण्याचा अंदाज असल्याने चटणीचे दर वाढण्याची शक्यता होलसेल मिरची व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

कोल्हापुरातील मिरचीच्या प्रमुख लक्ष्मीपुरी मार्केटसह अन्य ठिकाणी विक्रीसाठी येणारी मिरची ही प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच राज्यात विदर्भ, आजरासह संकेश्वर आदी ठिकाणांहून येते; मात्र सध्या महाराष्ट्रासह आंध्र, तामिळनाडू, कर्नाटकातही पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. दरम्यान, पुढील उत्पन्न पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काळात बाजारपेठेत येणार आहे.

दरवाढीची कारणे अशी…

* अवकाळी पावसाचा फटका
* मिरचीचा साठा यंदाच्या वर्षी कमी
* गुंटूरला पाऊस जास्त झाल्याने पिकास उशीर
* नवीन मिरची बाजारात यायला चार महिने अवधी
* पावसामुळे 70 टक्क्यांपर्यंत मिरचीचे नुकसान

Back to top button