कोल्हापूरसह 184 गावांमध्ये डेंग्यूची साथ | पुढारी

कोल्हापूरसह 184 गावांमध्ये डेंग्यूची साथ

कोल्हापूर, विकास कांबळे : जिल्ह्यात सध्या डेंग्यूची साथ झपाट्याने पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह जिल्ह्यातील जवळपास 184 गावांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यू तापापेक्षा अधिक तीव्र असलेला रक्तस्रावात्मक तापाच्या आजाराचे रुग्ण वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

डेंग्यूच्या साथीने सध्या जवळपास निम्म्या जिल्ह्याला घेरले आहे. स्वच्छ पाण्यावर तयार होणार्‍या डासांमुळे त्याचा प्रसार होत आहे. गेल्या चार दिवसांत दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही खडबडून गेली आहे. डेंग्यू फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डास चावल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी या आजाराची लक्षणे दिसू लागतात. गेल्या पंधरा वर्षांपासून या आजाराची तीव—ता हळूहळू वाढू लागली आहे. सौम्य स्वरुपाच्या तापाबरोबर डोके, डोळे दुखणे, भूक मंदावणे, मळमळ, उलट्या अशी या आजाराची लक्षणे आहेत. परंतु अलीकडील काळात डेंग्यूमध्ये रक्तस्रावात्मक ताप येऊ लागला आहे. हा ताप अतिशय धोकादायक असतो. यामध्ये प्लेटलेट अतिशय गतीने कमी होत असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

जवळपास निम्म्या जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. दरवर्षी हातकणंगले व करवीर या दोन तालुक्यांतच डेंग्यूचा उद्रेक झालेला दिसतो. गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहिली तर या दोन तालुक्यांतच डेंग्यूची रुग्णसंख्या अधिक आढळून येते. याच्या उपचारासाठी येणारा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसल्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. ऑक्टोबर महिन्यात शासकीय दरबारी नोंद असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे 800 आहेत. परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक रुग्ण आहेत. हातकणंगले तालुक्यात 200, शिरोळ 20, करवीर 120, पन्हाळा 100, गडहिंग्लज 30, कागल तालुक्यात 50 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 32 गावे संवेदनशील आहेत.

…अशी घ्या खबरदारी

* औषध फवारणी करून घ्यावी.
* घरामध्ये फवारणी केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे दारे, खिडक्या बंद करून बाहेर उभे राहावे.
* आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा.
* सर्व पाण्याची भांडी स्वच्छ करावीत.
* पाणी साठवणीच्या टाकीत गप्पी मासे सोडावेत.

Back to top button