कोल्हापूर : कथित ‘लव्ह जिहाद’मधील दोघेही पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

कोल्हापूर : कथित ‘लव्ह जिहाद’मधील दोघेही पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  अल्पवयीन मुलीला घेऊन पसार झालेला पाचगावातील संशयित तरुण संबंधित मुलीसोबत कर्नाटकात मिळून आला. पोलिसांची आठ पथके त्यांच्या मागावर होती. पोलिसांचे पथक संशयितासह मुलीला घेऊन रात्री उशिरा कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. मुलीच्या जबाबानंतरच या प्रकरणामागील सत्य समोर येणार आहे.

पाचगाव येथील एक तरुण 14 वर्षीय मुलीसोबत पसार झाला आहे. त्याच्या सुरुवातीच्या मोबाईल लोकेशनवरून त्याचा शोध सुरू होता. मात्र, त्याने तो मोबाईल सध्या बंद ठेवल्याचे तपासात पुढे आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चार पथकांसह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक, सायबर पोलिस व जुना राजवाडा पोलिसांची दोन पथके अशी एकूण आठ पथके त्यांच्या मागावर होती.

कर्नाटकातून घेतले ताब्यात

संशयितासह मुलीच्या शोधासाठी कर्नाटकात गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, हिंदुराव केसरे, सचिन देसाई यांचे पथक त्यांना घेऊन मध्यरात्री कोल्हापुरात दाखल होईल, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

Back to top button