कोल्हापूर : चैतन्यदायी लक्ष्मीपूजन | पुढारी

कोल्हापूर : चैतन्यदायी लक्ष्मीपूजन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आकाश उजळून टाकणार्‍या फटाक्यांची आतषबाजी, आकाशकंदिलांसह नेत्रदीपक विद्युत रोषणाई, सप्तरंगी रांगोळ्या, फुला-पानांच्या माळांनी सजलेले घरदार आणि नवीन कपडे परिधान करून परस्परांना शुभेच्छा देणारे आबालवृद्ध अशा उत्साही आणि आनंदी वातावरणात सोमवारी चैतन्यदायी दीपावली पर्वाचा जल्लोषात प्रारंभ झाला.

‘लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास’… या व अशा शुभेच्छा देत सोमवारपासून दीपावली पर्व सुरू झाले.

रविवारी मध्यरात्री फटाक्यांच्या आतषबाजीने उत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण शहर विद्युत रोषणाईने झगमगत असून आकाशकंदील आणि लाखोे दिव्यांच्या आराशीने आसमंत प्रकाशाने उजळून टाकला आहे.

अभ्यंगस्नान अन् सहकुटुंब फराळाचा अस्वाद

सोमवार हा नरकचतुर्दशीचा मुख्य दिवस. घरोघरी गेल्या काही दिवसांपासून दिवाळीची तयारी सुरूच होती. महिलांनी अंगणात सप्तरंगी रांगोळ्या रेखाटल्या. संपूर्ण परिसर तेलदिवे, मेणाच्या पणत्या आणि आकाशदिव्यांनी उजळला आहे. पहाटे आबालवृद्धांनी सुवासिक तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान केले. यानंतर नवीन कपडे परिधान करून घरातील कुलदैवतांचे दर्शन घेऊन थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेत परस्परांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. युवक-युवती तसेच बालचमूंनी फटाक्यांची आतषबाजी केली. सर्वांनी एकत्रित सहकुटुंब गोड, तिखट, खमंग अशा फराळाचा आस्वाद घेतला.

लक्ष्मीपूजन उत्साहात; सर्वत्र आतषबाजी

दिवाळी सणाचे महत्त्व असणार्‍या नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजनाचा योग गेल्यावर्षीप्रमाणेच यंदा एकाच दिवशी आला. सकाळी घरोघरी अभ्यंगस्नान, देवपूजा व देवदर्शनानंतर सायंकाळी घरोघरी तसेच व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मी व कुबेरपूजनाचा सोहळा मंगलमय वातावरणात साजरा झाला. सजवलेल्या पाटावर मंगल कलश, लक्ष्मी देवीची प्रतिमा, सोन्या-चांदीचे दागिने, नोटा-नाणी ठेवून लक्ष्मी व कुबेराची पूजा करण्यात आली. झेंंडूची फुले, आंब्याचे डहाळे, ऊस आणि केळीचे खुंट लावून पारंपरिक पद्धतीने आरास करण्यात आली होती. पेढे, लाह्या-बत्तासे, फराळ असा नैवेद्य दाखविण्यात आला. व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मी-कुबेर पूजनाबरोबरच हिशेबाच्या वह्यांचे पूजनही करण्यात आले. यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

ऑनलाईन शुभेच्छांचा वर्षाव

दिवाळीनिमित्त ऑनलाईन शुभेच्छांचा वर्षाव जोरात आहे. वसुबारसपासून सुरू झालेल्या शुभेच्छांच्या वर्षावांनी सोमवारी टोक गाठले. रविवारी मध्यरात्रीपासूनच शुभेच्छा संदेशांचा अक्षरश: पाऊस सुरू होता.

Back to top button