आगामी महापालिका निवडणूक भाजप म्हणूनच लढवणार : प्रकाश आवाडे | पुढारी

आगामी महापालिका निवडणूक भाजप म्हणूनच लढवणार : प्रकाश आवाडे

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : पहिला महापौर भाजपचा करण्यासाठी आगामी महापालिका निवडणूक भाजप म्हणूनच लढवणार आहे. उमेदवारांची संभाव्य यादी तयार असून योग्य वेळ जाहीर करू, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. महापालिका निवडणुकीसंदर्भात माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर चर्चा करणार आहे, असेही त्यांनी अन्य एका प्रश्नावर सांगितले.

आवाडे म्हणाले, मी विजयी झाल्यानंतर सरकार येणार आहे की नाही याचा विचारही न करता पहिल्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंब्याचे पत्र दिले. तेव्हापासून भाजपचेच काम करत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी वेगळा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरून बहुमत मिळवून भाजपचाच महापौर होईल, असा दावा त्यांनी केला.

सुळकूड पाणी योजनेबाबत ते म्हणाले, विरोध होत असला तरी तोडगा काढून सुळकूड पाणी योजना कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावली. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी 5 ते 6 वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे कृष्णा, पंचगंगा वरील पाणी योजनांचे सक्षमीकरण अपरिहार्य आहे.

संबंधित बातम्या

दूधगंगा काठावरून विरोध सुरू आहे याकडे लक्ष वेधले असता आमदार आवाडे म्हणाले, दूधगंगा नदीवरील सुळकूड योजनेसाठी सामूहिक प्रयत्न आहेत. विरोधात भूमिका घेतलेल्यांची समजूत काढण्यासाठी मध्यस्थी केली होती. परंतु अलीकडच्या काळात पुन्हा विरोध सुरू आहे. यासाठी पुन्हा मध्य काढून सुळकूड योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यानच्या काळात शहरात दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे व कृष्णा आणि पंचगंगा योजनांची 108 एमएलडी पाणी उपसा करण्याची क्षमता आहे. मात्र उचललेले सर्व पाणी गळतीमुळे येत नाही. या योजनांच्या दुरुस्तीच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. गळती थांबवली तर शहराला दररोज पाणी देण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पत्रकार बैठकीस प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलाकते, अहमद मुजावर, संजय केंगार, नरसिंग पारीख उपस्थित होते.

Back to top button