कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत सात ठिकाणी अतिवृष्टी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत सात ठिकाणी अतिवृष्टी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 7) सकाळी अकरा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सात ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत तीन फुटांनी वाढही झाली. जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. शुक्रवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. दुपारी काही काळ शहर आणि परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.

जिल्ह्यात तीन दिवस पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारी रात्री शहरासह जिल्ह्यात अनेक भागांना पावसाने झोडपून काढले. शिरोळ तालुक्यात दमदार पाऊस झाला. तालुक्यातील शिरढोण (81.3), जयसिंगपूर (66.5) व नांदणीत (83.5 मि.मी.) अतिवृष्टीची नोंद झाली. इचलकरंजीत 54.5 मि.मी. पाऊस गेल्या 24 तासांत झाला. हातकणंगले तालुक्यातील हेर्लेत 63.5 मि.मी., तर करवीर तालुक्यातील सांगरूळ परिसरात 63.6 मि.मी. पाऊस झाला. शाहूवाडी तालुक्यातील आंबा (124.3), गगनबावडा (123.3) , कागल तालुक्यातील खडकेवाडा (67.6) व भुदरगड तालुक्यातील कडगाव (68.1 मि.मी.) येथेही अतिवृष्टी झाली.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 22.3 मि.मी.पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 70.6 मि.मी. इतका झाला. शाहूवाडीत 57.5 मि.मी., शिरोळ तालुक्यात 57.6 मि.मी., तर हातकणंगले तालुक्यात 46.1 मि.मी. पाऊस झाला. कुंभी धरण परिसरात 175 मि.मी., कोदे परिसरात 115 मि.मी., तर कासारी परिसरात 102 मि.मी. पाऊस झाला. कोल्हापूर शहरात 10 मि.मी. पाऊस झाला.

गुरुवारी पंचगंगेची पातळी 9.9 फूट होती, शुक्रवारी सकाळी आठ वाजता ती 12.8 फुटांपर्यंत वाढली. यानंतर दिवसभर पाणी पातळी स्थिर होती. दरम्यान, आज दुपारी काही काळ शहर आणि परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. सायंकाळी वातावरण ढगाळ झाले. मात्र, पाऊस झाला नाही. ढगाळ वातावरणाने सायंकाळी हवेतील गारठा वाढला होता. काही काळ बोचरे वारेही जाणवत होते.

Back to top button