कागल तिहेरी हत्याकांड : मालमत्तेच्या वादातून आईसह दोन्ही मुलांचा बापाकडून खून | पुढारी

कागल तिहेरी हत्याकांड : मालमत्तेच्या वादातून आईसह दोन्ही मुलांचा बापाकडून खून

कोल्हापूर / कागल; पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व दोन मुलांचा खून करणार्‍या संशयित प्रकाश धोंडिराम माळी (वय 42, रा. गणेशनगर, कागल) याला बुधवारी कागल न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, मृत महिलेच्या भावाने आपल्या बहिणीचा मालमत्तेच्या वादातून छळ झाल्याची फिर्याद दिल्याने या तिहेरी हत्याकांडाला वेगळे वळण लागले आहे.

पोलिस ठाणे तसेच न्यायालयातही संशयित निर्विकार चेहर्‍याने वावरत होता. संशयितासह त्याचा भाऊ, भावजय आणि चुलती यांनी मृत गायत्रीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद गायत्रीचा भाऊ प्रकाश शंकर माळी (रा. तळंदगे, ता. हातकणंगले) याने दिल्याने संशयित आरोपींची संख्या चार झाली आहे. या हत्याकांडानंतर गणेशनगर परिसरात अक्षरश: शुकशुकाट असून, शेजारी राहणारे लोक घराला कुलूप लावून अन्यत्र राहण्यासाठी गेले आहेत.

संशयिताने पत्नी गायत्री (35), मुलगी आदिती (17) व मुलगा कृष्णा (13) अशा तिघांचा मंगळवारी खून केला. मालमत्तेच्या हिश्श्यासाठी गायत्रीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संशयित प्रकाश धोंडिराम माळी याचा भाऊ अमोल धोंडिराम माळी (45), त्याची पत्नी अंजना अमोल माळी (40) आणि चुलती शारदा सुरेश माळी (45, सर्व रा. कोष्टी गल्ली, कागल) यांचा समावेश आहे. माळी यांचे मूळ घर कागलमधील कोष्टी गल्लीत असून, हे सर्वजण तेथे राहतात.

येथील गणेशनगर घरकूल वसाहतीत प्रकाश माळी हा वर्षभरापूर्वी राहण्यास आला होता. दोन वर्षांपासून माळी पती-पत्नीमध्ये धुसफुस सुरू होती. यातून गायत्री माळी काही दिवसांसाठी मुलांसह माहेरी निघून गेल्या होत्या. तेव्हा प्रकाश माळी हा एकटाच गणेशनगरमधील नव्या घरात राहत होता. पत्नी माहेरून परतल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता. यातूनच त्याने पत्नीचा काटा काढण्याचे ठरविले.

तिघांची वेगवेगळ्या वेळी हत्या

प्रकाश कागलनजीकच्या एका साखर कारखान्यात नोकरीला आहे. मंगळवारी तो कामावर गेला नव्हता. दुपारी दोनच्या सुमारास त्याचे पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. यातच त्याने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह त्याने स्वयंपाकघरात ठेवला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास मुलगा कृष्णात शाळेतून घरी आला. त्याने निपचित पडलेल्या आईबद्दल विचारणा केली असता, प्रकाशने मुलाचाही गळा आवळून खून केला.

रात्री आठच्या सुमारास मुलगी आदिती ही इचलकरंजी येथून कॉलेज आटोपून घरी आली असता, तिचाही गळा आवळण्याचा त्याने प्रयत्न केला; पण तिने प्रतिकार केल्यानंतर दगडी बत्ता तिच्या डोक्यात घालून तिलाही ठार मारले. यानंतर तो सायकलवरून पोलिस ठाण्यात आला.

मालमत्तेच्या हिश्श्यासाठी छळाची फिर्याद

मृत गायत्रीचा भाऊ प्रकाश शंकर माळी (वय 37, रा. तळंदगे, ता. हातकणंगले) याने कागल पोलिसांत फिर्याद दिली आहे. यामध्ये मुख्य संशयित प्रकाश धोंडिराम माळी, त्याचा भाऊ अमोल माळी, भावजय अंजना माळी, चुलती शारदा माळी हे मालमत्तेच्या हिश्श्यासाठी आपल्या बहिणीचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. याच कारणातून बहीण गायत्री, भाची आदिती व भाचा कृष्णात यांचा खून करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दारात चपला, कपडे

माळी याच्या घराला लागून असणार्‍या खिडकीच्या दोरीवर माळी कुटुंबीयांचे धुतलेले कपडे होते. तसेच मृत गायत्री, आदिती, कृष्णात यांच्या चपलाही खिडकीलगत पडून होत्या.

दुपारी न्यायालयात हजर

प्रकाश माळी याला अटकेनंतर गांधीनगर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. दुपारी तीनच्या सुमारास त्याला कागल पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तिथून चार वाजण्याच्या सुमारास कागल दिवाणी न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Back to top button