कोल्हापूर : शाळांमध्ये ग्रंथालये; पण ग्रंथपालच नाहीत | पुढारी

कोल्हापूर : शाळांमध्ये ग्रंथालये; पण ग्रंथपालच नाहीत

कोल्हापूर ; प्रवीण मस्के : वाचनसंस्कृती वाढावी, विद्यार्थ्यांचा पुस्तक वाचनाकडील ओढा वाढावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र जिल्ह्यातील बहुतांश माध्यमिक शाळांमध्ये ग्रंथालये आहेत परंतु ग्रंथपाल नाही, अशी परिस्थिती आहे.

भारतातील तक्षशीला, नालंदा, विक्रमशीला या प्राचीन विद्यापीठांमध्ये मोठी ग्रंथालये होती, असे पुरावे आहेत. आज सार्वजनिक, विद्यापीठ, शाळांमध्ये स्वतंत्र ग्रंथालये आहेत.

जिल्ह्यात माध्यमिकच्या सुमारे 1064 शाळा आहेत. आरटीईच्या निकषांनुसार शिक्षक ग्रंथालय आणि विद्यार्थी ग्रंथालये आहेत. यात पूर्णवेळ 30 हून अधिक, तर अर्धवेळ 84 ग्रंथपाल आहेत. राज्यात सुमारे 1300 अर्धवेळ, तर 1500 पूर्णवेळ ग्रंथपाल आहेत. सध्या अनेक ग्रंथपालपदाच्या जागा रिक्त असून त्या भरलेल्या नाहीत. एक हजार पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एक ग्रंथपाल पद मंजूर आहे. कनिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न माध्यमिक शाळा सोडल्यास इतर शाळांची पटसंख्या 500 च्यावर नाही.

अर्धवेळ ग्रंथपाल असून त्यांना वेतनही अर्धेच मिळते. तसेच पेन्शन व इतर सोयी-सुविधांचा लाभ मिळत नाहीत. त्यामुळे काही शाळांमध्ये ग्रंथालयाचा कार्यभार शिक्षकच पाहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून शासनाने शिक्षकेतर कर्मचारी भरती बंदी केल्याने ग्रंथपाल पदे भरलेली नाहीत. त्यामुळे शाळांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शाळांचा असाही पुढाकार

शालेय अभ्यासक्रमापलीकडे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून पुस्तक वाचन स्पर्धा यासह पुस्तक पेटी योजना काही शाळांमध्ये राबविली जाते. काही शाळांकडून विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तके वाचावी, याबद्दल माहिती दिली जाते. वाचनसंस्कृती वाढावी, यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत शाळांमध्ये उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

Back to top button