कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीत अडथळा; ‘उत्तरेश्वर’च्या 13 जणांवर गुन्हा | पुढारी

कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीत अडथळा; ‘उत्तरेश्वर’च्या 13 जणांवर गुन्हा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : गणेश विसर्जन मिरवणुकीत वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिसांशी हुज्जत घालून अडथळे निर्माण केल्याप्रकरणी उत्तरेश्वर पेठ येथील 13 कार्यकर्त्यांविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये दोन सिस्टीम ऑपरेटरचाही समावेश आहे.

ध्वनिक्षेपक बंद करण्याच्या न्यायालयीन आदेशाचे पालन करणार्‍या पोलिसांशी वाद घालून झालेल्या झटापटीत हवालदार संभाजी माने यांच्या पायाला दुखापत झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रोहित वसंतराव माने, अजिंक्य दत्तात्रय शिद्रुक, वैभव संजय चव्हाण, निखिल दिलीप तिबिले, निखिल अशोक राबाडे, यश चंद्रकांत चव्हाण, विपुल विजय साळोखे, प्रेम योगेश येळावकर, आकाश रामचंद्र वर्णे, वैभव शिवाजी मोरे, रोहित ऊर्फ गोट्या शिवाजी गाडगीळ (रा. सर्व. उत्तरेश्वर पेठ), सिस्टीम ऑपरेटर संग्राम पाटील, अमित पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

पोलिसांशी हुज्जत

गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री 12 नंतर ध्वनिक्षेपक यंत्रणा न्यायालयाच्या निर्देशानुसार बंद करण्यात आली. या कारणावरून कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिसांशी हुज्जत घालून वादावादी केली. महाद्वार रोड ते गंगावेस मार्गावर ठिय्या मारून विसर्जन मिरवणुकीत अडथळे निर्माण करण्यात आले. शहरातील अन्य गणेशोत्सव मंडळांची अडवणूक करण्यात आली.

रात्री दोनला साऊंड वाजविला!

पोलिसांच्या सूचनेचे उल्लंघन करून ध्वनिक्षेपक यंत्रणा लावून त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ‘पूर्ण महाद्वार रोड रात्री बाराला बंद झाला; पण एकट्या वाघाने रात्री दोनला साऊंड वाजविला पण… लावली ताकद दिलं दाखवून.’ अशा आशयाचा मजकूर असलेला व्हिडीओ व्हायरल केल्याचे हवालदार शिवाजी पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. एकाचवेळी 13 जणांवर गुन्हा दाखल झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे.

Back to top button