इचलकरंजी : मानाच्या गणपतीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन, विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ | पुढारी

इचलकरंजी : मानाच्या गणपतीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन, विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा :  इचलकरंजीत परंपरेप्रमाणे शिवतीर्थावळील शहर वाहतूक शाखेसमोर विसर्जन मिरवणुकीस उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी मानाच्या श्री बिरदेव गणेशोत्सव मंडळाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. मंडळाच्या गणेश मूर्तीचे पूजन खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड,  इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपअधीक्षक बीबी महामुनी, प्रांताधिकारी विकास खरात माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

पालखीत सजलेल्या गणेश मूर्तींसमोर गणपतीची आरती म्हणून श्रीफळ वाढवून या मिरवणुकीला सुरवात झाली. खा. धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी धनगरी ढोल गळ्यात घालत वाद्य वाजवले, तर पोलिसांनी गाण्यावर ठेका धरला. यावेळी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, राजू ताशीलदार,अप्पर तहसीलदार शरद पाटील, शहर वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, रविंद्र माने, राहुल खंजिरे, शशांक बावचकर, रवी रजपूते, पुंडलिकराव जाधव, शेखर शहा, शशिकला बोहरा बिरदेव वाचनालयाचे अरविंद कोळेकर, आनंदा कोळेकर, सचिन डोंगरे, अग्णू लवटे, पोपट लवटे, महादेव कोळेकर, तेजन ताडे आदी मान्यवर उपस्थित होते. मोनिका जाजू यांनी सूत्रसंचालन केले.

विसर्जन मार्गावर विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी १८ व्यासपीठ उभारले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या या व्यासपीठाच्या माध्यमांतून या मार्गावर येणाऱ्या गणेश मंडळाचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत आहे. विसर्जन सोहळ्याला अधून मधून पावसाने हजेरी लावली मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह अबाधित असल्याचा पाहिला मिळाला.

पंचगंगेतच विसर्जन

इचलकरंजीत विसर्जनावरून वाद निर्माण झाला होता. पंचगंगेत विसर्जन करण्यावरून आमदार प्रकाश आवाडे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी मंडळांची पंचगंगेत विसर्जनाची भूमिका लावून धरली होती. महापालिका प्रशासनाकडून पर्यावरण पूरक कुंडाची सोय करण्यात आली आहे. त्यास ही प्रतिसाद मिळाला. मात्र अनेक लहान मोठ्या मंडळानी पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. नदीत विसर्जनास पोलीस प्रशासनाने रोख लावण्यात न आल्याने काही दिवसांपासून निर्माण झालेल्या विसर्जन वादावर अखेर पडदा पडला आहे.

Back to top button