कोल्हापुरात वैशिष्ट्यपूर्ण अन् भव्य गणेशमूर्तींचे आकर्षण; तांत्रिक देखाव्यांवर भर, विसर्जन मिरवणुकीसाठी उद्या ड्रॉ | पुढारी

कोल्हापुरात वैशिष्ट्यपूर्ण अन् भव्य गणेशमूर्तींचे आकर्षण; तांत्रिक देखाव्यांवर भर, विसर्जन मिरवणुकीसाठी उद्या ड्रॉ

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : महापूर व लॉकडाऊननंतर तीन वर्षांनी यंदा निर्बंधमुक्‍त गणेशोत्सव होत असल्याने आगमन व विसर्जन मिरवणुकांबरोबरच गणेशांच्या मूर्तींची संख्या आणि उंचीही वाढली आहे. सणातील वेगळेपण जपणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींबरोबरच गणेशमूर्तींची उंची आणि संख्येतही वाढ झाली आहे. अगदी 3 फुटांपासून 5, 7, 8, 9, 10,11, 15, 17 ते 21 फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना विविध गणेश मंडळांच्या वतीने करण्यात आली आहे. 2019 च्या तुलनेत 2022 मध्ये गणेश मंडळांची संख्या वाढली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाचा कालावधी अवघ्या दहा दिवसांचा असल्याने गेल्या महिन्याभरापासूनच याची लगबग सुरू आहे. निर्बंधमुक्‍त गणेशोत्सवामुळे गणेश मंडळांच्या वतीने वेगळेपण जपणारा उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. गणेश आगमनाच्या मिरवणुकीपासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंतची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गणेशमूर्तीला 4 फुटांची मर्यादा होती. यामुळे गेली दोन वर्षे प्रतीकात्मक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा निर्बंधमुक्‍त गणेशोत्सवामुळे मूर्तींवरील उंचीची मर्यादा उठली असून मंडळांनी प्रतिवर्षीप्रमाणे 5 फुटांवरील मूर्तींची निर्मिती केली आहे.

स्वच्छता मोहीम

घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी शहरातील पंचगंगा नदी घाट परिसरासह विसर्जन ठिकाणची स्वच्छता केली. पंचगंगा नदी घाट परिसर, रंकाळा तांबट कमान, इराणी खण, कोटितीर्थ तलाव, मंगेशकरनगर खण, रुईकर कॉलनी विहीर, बापट कॅम्प, राजाराम बंधारा,कळंबा तलाव, रंकाळा टॉवर, संध्यामठ, कोटितीर्थ शाळा परिसरासह मिरवणूक मार्गावर स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

…या आहेत भव्य मूर्ती

शाहूनगर मित्र मंडळाची कायमस्वरूपी 21 फुटी फायबरची गणेशमूर्ती, छत्रपती शिवाजी चौकातील 21 फुटी महागणपती, संयुक्‍त छत्रपती शिवाजी रिक्षा मंडळाची 21 फुटी गणेशमूर्ती, पूल गल्‍ली तालीम मंडळाची 21 फुटी सिद्धिविनायक रूपातील मूर्ती, जुना बुधवार पेठ तालीम व भगतसिंग तरुण मंडळाचा 21 फुटी गणेश, न्यू सम—ाट चौक मित्र मंडळ व एस. पी. बॉईज शनिवार पेठेचा 21 फुटी गणेश, शुक्रवार गेट येथील 21 फुटी गणेश, शाहू फ—ेंड सर्कल व वाय. पी. पोवारनगर मित्र मंडळाची 21 फुटी मूर्ती लक्षवेधी आहेत. याशिवाय दिलबहार तालीम मंडळाचा दख्खनचा राजा, तटाकडील तालीम मंडळाची लालबागचा राजा रूपातील मूर्ती, शनिवार पेठेतील अष्टविनायक तरुण मंडळ, मंगळवार पेठ रिक्षा मित्र मंडळ, सुबराव गवळी तालीम, नंगीवली तालीम मंडळ, फोर्ड कॉर्नरजवळील शिवशक्‍ती तरुण मंडळ, सत्यनारायण तरुण मंडळ, विश्‍वशांती तरुण मंडळ यासह शहरातील विविध वैशिष्ट्यपूर्ण भव्य मूर्तीही गणेशोत्सवाची शोभा वाढवत आहेत.

सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीसाठी उद्या ड्रॉ

शहरातील विसर्जन मिरवणुकीसाठी उद्या (दि. 6) पोलिस मुख्यालयात ड्रॉ काढण्यात येणार आहे. राजारामपुरीतील गणरायांच्या आगमन मिरवणुकीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा ड्रॉ काढण्यात आला होता. त्याच पद्धतीने ड्रॉचे नियोजन करण्यात येत आहे. राज्य शासनाने सर्वच निर्बंध मुक्‍त केल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांसह तरुणाईत कमालीचा जल्‍लोष आहे.कोणताही अनुचित प्रकार न घडता शहर, उपनगरासह जिल्ह्यात उत्साही वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गात शिस्त असावी, वादविवाद टाळावेत, मिरवणूक जास्त काळ रेंगाळू नयेत, तसेच मिरवणुकीतील क्रम निश्‍चितीसाठी ड्रॉ काढण्याचा हेतू असल्याचेही वरिष्ठाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. यंदा विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

उद्यमनगरात तांत्रिक देखाव्यांवर भर

यंदा निर्बंधमुक्‍त गणेशोत्सवामुळे सार्वजनिक तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहास उधाण आले आहे. आपले कलाकौशल्य देखाव्यांच्या माध्यमातून दाखविण्याची जणू स्पर्धाच असते. शिवाजी उद्यमनगरमध्ये अशा कलाकौशल्यातून तांत्रिक देखाव्यांची उभारणी होते. यंदाही या भागातील तांत्रिक देखावे नागरिकांचे आकर्षण आहे. राधानगरी धरणाची प्रतिकृती, चेटकणीचा थरार, ऑक्टोपस या तांत्रिक देखाव्यांसह थ—ीडी मेटल वर्कच्या माध्यमातून खिळ्यांची मूर्ती आकर्षण आहे. विविध तरुण मंडळांच्या आकर्षक मूर्ती पाहण्यास खुल्या झाल्या आहेत. बहुतांश तांत्रिक देखावे सोमवारपासून खुले होणार आहेत.

Back to top button