कोल्हापूर : साऊंड… लाईट… जनरेटरची कोटींची उलाढाल! | पुढारी

कोल्हापूर : साऊंड... लाईट... जनरेटरची कोटींची उलाढाल!

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : महापूर, कोरोनानंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याची लगबग सुरू आहे. आवाज मर्यादेचे पालन करून साऊंड सिस्टीम वापराला राज्य सरकारने परवानगी दिल्याने यावर अवलंबून असणार्‍या 7 ते 8 हजार कुटुंबांना आधार मिळाला आहे.

साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, जनरेटर, ट्रॅक्टर यामुळे जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल होते. साऊंड सिस्टीम लावताना कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणार नसल्याची हमीही साऊंड सिस्टीम असोसिएशनेही पोलिस प्रशासनाला दिली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात उत्साहासोबतच नियमांचेही पालन आवश्यक असल्याने साऊंड सिस्टीम वापराबाबत पोलिस प्रशासन आणि खुद्द साऊंड सिस्टीम असोसिएशनही एकाच भूमिकेत आहेत. नियमबाह्य साऊंड सिस्टीमला परवानगी देऊ नये, असे ठामपणे सांगितले आहे.

7 ते 8 हजार कुटुंबांना आधार

जिल्ह्यात साऊंड सिस्टीम मालकांची संख्या 3,500 च्या घरात आहे. त्यांच्याकडे प्रत्येकी तीन ते चार कर्मचारी काम करतात. यासह विद्युत रोषणाई, जनरेटर मालक, ट्रॅक्टर मालक, चालक, फॉग मशिन, ब्लास्ट मशिन अशांतून 7 ते 8 हजार कुटुंबांना आर्थिक हातभार लागत असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष मुल्ला यांनी सांगितले.

साहित्य खरेदीची लगबग

शहरातील टेंबे रोड, शिवाजी स्टेडियम, शाहू स्टेडियम परिसरात ग्रामीण भागासह कराड, इस्लामपूर, निपाणीसह कोकणातूनही गणेश मंडळांचे कार्यकर्ते येथे येत आहेत.

‘प्लाझा’वर बंदी गरजेची

प्लाझा नावाने नवी सिस्टीम बाजारात आली आहे. एका बॉक्समध्ये चार स्पीकर लावून याद्वारे कंपणे निर्माण करणारा आवाज बाहेर पडतो. यावर बंदी गरजेची असल्याचेही असोसिएशनने मान्य केले आहे.

Back to top button