कोल्हापूर : डौलाने फडकणार तिरंगा | पुढारी

कोल्हापूर : डौलाने फडकणार तिरंगा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजपासून (दि. 13) जिल्ह्यात घरोघरी मोठ्या डौलाने तिरंगा फडकणार आहे. सुमारे पाच लाखांहून अधिक राष्ट्रध्वज आकाशात तीन दिवस फडकत राहतील. राष्ट्रभक्‍तीचा हा अनोखा जागर करण्यासाठी नागरिकांत प्रचंड उत्सुकता आणि उत्साह आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. या उपक्रमांतर्गतच दि. 13 ते दि. 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तीन दिवस तिरंगा लावता येणार आहे. जिल्ह्यात 9 लाख 57 हजार मिळकती आहेत. त्याकरिता 6 लाख 57 हजार तिरंग्यांची मागणी करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाला विक्रीसाठी केंद्र शासनाकडून चार लाख तिरंगे उपलब्ध झाले. यासह स्थानिक पातळीवरही विविध माध्यमातून तिरंगा विक्री सुरू होती.

घरावर शनिवारी सूर्योदयानंतर तिरंगा लावावा लागेल, त्यानंतर तो दि. 15 रोजी सूर्यास्तापूर्वी काढावा लागेल. या तीन दिवसांत फक्‍त घरावर लावलेला तिरंगा रात्रंदिवस फडकत ठेवता येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती संवाद अभियानही राबविण्यात आले. त्याद्वारे ध्वजसंहिता आणि काय करावे, काय करू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ध्वजारोहणाचे नियोजन

आजपासून सुरू होणार्‍या या अभियानासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. आजपासून तीन दिवस ध्वजारोहणासाठी ग्रामपंचायतींसह विविध संस्था, संघटनांचे नियोजन सुरू आहे. काही ठिकाणी गावातील सफाई कर्मचारी, महिला कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, सरकारी रुग्णालयातील परिचारिका आदींच्या हस्ते, कुठे गावातील विधवा महिला, कुठे स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे वारस, कुठे
शहीद जवानांची वीरमाता, वीरपत्नी यांच्या हस्ते, तर कुठे माजी सैनिक, आजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे.

‘तिरंग्या’सह सेल्फी पोर्टलवर पाठवा : जिल्हाधिकारी

तिरंग्यासह सेल्फी घ्या, ते फोटो पोर्टलवर पाठवा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. फोटोसह ड्रोनद्वारे शूटिंग घेऊन तेही पाठवा, असेही त्यांनी सांगितले. तिरंग्यासह काढलेले सेल्फी, फोटो, व्हिडीओ हीींिीं://हरीसहरीींळीरपसर.लेा/ या पोर्टलवर झखछ अ ऋङअॠ व णझङजअऊ डएङऋखए थखढक ऋङअॠ दोन बटनवर क्लिक करून अपलोड करावा लागणार आहे.

काय करावे

राष्ट्रध्वज फडकावताना तो हाताने कातलेला, विणलेला किंवा मशिनद्वारे सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी, लोकरपासून तयार केलेला वापरावा. राष्ट्रध्वज हा 3:2 या प्रमाणात असावा. केशरी रंग वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील याप्रमाणे फडकवावा.
राष्ट्रध्वज उतरवताना सावधतेने व सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. राष्ट्रध्वज कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही याची काळजी घ्यावी.

काय करू नये

राष्ट्रध्वज प्लास्टिक किंवा कागदी वापरू नये. कोणत्याही सजावटी वस्तू लावू नयेत. राष्ट्रध्वज फडकावतेवेळी फुलांच्या पाकळ्या ठेवू नयेत.
राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह काढू नये. राष्ट्रध्वज फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. एकाचवेळी इतर ध्वजांसोबत एकाच काठीवर राष्ट्रध्वज फडकवू नये. तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून अन्य कोणत्याही प्रकारच्या शोभेसाठी राष्ट्रध्वजाचा उपयोग करू नये.

Back to top button