कोल्हापूर : जुलै महिन्यात व्यापारी तूट उच्चांकी पातळीवर! | पुढारी

कोल्हापूर : जुलै महिन्यात व्यापारी तूट उच्चांकी पातळीवर!

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : वस्तूंच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या सातत्याने होणार्‍या अवमूल्यनाने आयात बिलात झालेली वाढ यामुळे देशातील व्यापारी तूट (ट्रेड डेफिसीट) उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. जुलै महिन्यामध्ये झालेल्या एकूण आयात-निर्यातीच्या व्यवहारांमध्ये ही तूट 31.02 बिलियन डॉलर्सवर म्हणजे सुमारे 2 लाख 48 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. व्यापारी तुटीचा हा आजवरचा उच्चांक समजला जात आहे.

भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचा जुलै महिन्यातील अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात देशातील व्यापारी तुटीचा आलेख वाढत असल्याकडे निर्देश केला आहे. जून महिन्यामध्ये व्यापारी तुटीचे प्रमाण 26.18 बिलियन डॉलर्स (सुमारे 2 लाख 4 हजार कोटी रुपये) इतके होते. जुलै महिन्यामध्ये यामध्ये तब्बल 20 टक्क्यांची वाढ झाली.

व्यापारी तुटीच्या पार्श्वभूमीवर आयातीला लगाम घालण्यासाठी केंद्र शासनाने सोन्यावरील आयात शुल्क वाढवले. भारत हा सोने खरेदी करणार्‍या ग्राहकांत दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. सोन्याची आयात वित्तीय तुटीला मोठा हातभार लावते. यामुळे सोन्यावरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेऊनही ही वित्तीय तूट वाढताना दिसते. याला प्रामुख्याने रुपयाची डॉलर्सच्या तुलनेत होणारी घसरण कारणीभूत आहे.

भारत सरकारने 1 जुलै रोजी सोन्याच्या आयात शुल्कात साडेसात टक्क्यांवरून साडेबारा टक्क्यांवर म्हणजे 5 टक्क्यांची वाढ केली होती. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात जुलैमध्ये 107 टन सोने आयात केले. गतवर्षी जूनमध्ये ही आयात अवघी 11 टन होती. सोने आयातीतील शासकीय आकडेवारीत जून 22 मध्ये आयात केलेल्या सोन्याचे मूल्य 2.611 बिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 20 हजार 888 कोटी रुपये इतके आहे, तर गतवर्षी याच कालावधीत 0.97 बिलियन डॉलर्स सोने आयातीवर खर्ची पडले.

सोने आयातीतील ही 169.45 टक्क्यांची वाढ सध्या भारतीय आयात-निर्यातीलील तुटीची दरी रुंदावण्यास मोठा हातभार लावते आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा विचार केला, तर गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत वित्तीय तुटीचे प्रमाण दुपटीहून अधिक म्हणजे 70.25 बिलियन डॉलर्स (सुमारे 5 लाख 47 हजार कोटी रुपये) इतके आहे. तुटीतील फरक हा फरक कमी करणे हे भारतीय अर्थव्यवस्थेपुढील मोठेे आव्हान आहे.

Back to top button