करवीरमध्ये काँटे की टक्‍कर! | पुढारी

करवीरमध्ये काँटे की टक्‍कर!

कसबा बावडा / शिरोली दुमाला : पुढारी वृत्तसेवा करवीर पंचायत समितीच्या 26 गणांसाठी गुरुवारी पंचायत समिती करवीर येथे आरक्षण सोडत प्रक्रिया झाली. यावेळी 15 सर्वसाधारण (8 महिला), 7 नागरिकांचा मागास प्रवर्ग (4 महिला), तर 4 अनुसूचित जाती (2 महिला) आरक्षित झाल्या आहेत. अनेक विद्यमान सदस्यांच्या गणातील आरक्षण बदलले आहे. इच्छुकांना नव्या आरक्षणानुरूप मतदारसंघाची शोधाशोध करावी लागणार आहे. सोडत प्रक्रिया उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल भामरे-मुळे, गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

अनुसूचित जाती प्रवर्गातील 4 जागांसाठी प्रारंभी आरक्षण सोडत झाली. यामध्ये 2 जागा महिलांसाठी असल्याने चिठ्ठी उचलून महिला आरक्षण निश्‍चित करण्यात आले. शिरोली दुमाला व वळिवडे या दोन गणांच्या चिठ्ठ्या निघाल्याने या 2 जागा अनुसूचित जाती महिलांसाठी, तर शिये व गोकुळ शिरगाव या 2 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्या.

दुसर्‍या टप्प्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 7 जागांसाठीचे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये 4 ठिकाणी नागरिकांचा मागास महिला व 3 ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण निश्चित करण्यात आले. उजळाईवाडी, कसबा बीड, सांगरूळ, वडणगे, खुपिरे या पाच गणांत थेट आरक्षण पडले. उर्वरित 2 गण निश्चित करताना वाशी, कणेरी, उचगाव पश्चिम, मुडशिंगी, दिंडनेर्ली यांच्यापैकी दोन चिठ्ठ्या मुडशिंगी व वाशी गणाच्या निघाल्या. त्यामुळे कणेरी, उचगाव पश्चिम व दिंडनेर्ली हे गण सर्वसाधारण प्रवर्गात समाविष्ट झाले.

शेवटी 15 जागांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण काढण्यात आले. यातील 7 गण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. गत चार पंचवार्षिक निवडणुकांत एकदाही आरक्षण पडलेले नाही या निकषांनुसार वसगडे, पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे, वाकरे, हसूर दुमाला गणांची नावे निश्चित झाल्यानंतर 2002 च्या निवडणुकीत एकदाच आरक्षण पडले आहे, त्यांचा विचार झाला. त्यामध्ये निगवे दुमाला व निगवे खालसा हे दोन गण निश्चित झाले. त्यामुळे उर्वरित आठ जागांवर सर्वसाधारण आरक्षण पडले. यावेळी पंचायत समिती, महसूल विभागाचे कर्मचारी, इच्छुक उमेदवार, माजी सदस्य, नागरिक उपस्थित होते.

प्रवर्गनिहाय आरक्षण असे…

अनुसूचित जाती महिला : शिरोली दुमाला, वळिवडे.
अनुसूचित जाती : शिये , गोकुळ शिरगाव.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : उजळाईवाडी, वडणगे, खुपिरे, वाशी. नागरिकांचा मागास प्रवर्ग : कसबा बीड, सांगरूळ, मुडशिंगी. सर्वसाधारण महिला : वसगडे, पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे, वाकरे, हसूर दुमाला, निगवे दुमाला, निगवे खालसा, सर्वसाधारण : उचगाव पश्‍चिम, उचगाव पूर्व, कणेरी, सडोली खालसा, शिंगणापूर, परिते, कोपार्डे, दिंडनेर्ली.

हेही वाचा

Back to top button