इचलकरंजीतही आकडेमोड सुरू | पुढारी

इचलकरंजीतही आकडेमोड सुरू

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा :  सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण ग्राह्य मानत पुढील निवडणुका ओबीसी आरक्षणाचा समावेश करून घेण्यात याव्यात, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत ओबीसी समाजाचे किती नगरसेवक असणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. दरम्यान, सभागृहात 18 ते 19 नगरसेवक ओबीसी वर्गातून निवडून जातील, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

इचलकरंजीला महापालिका मिळाल्यानंतर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यामुळे महापालिकेची निवडणूक कशी असेल याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. दरम्यानच्या काळात बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर शिक्‍कामोर्तब केले. या निर्णयाचे इचलकरंजीतील ओबीसी समाजाने स्वागत केले आहे; परंतु महापालिकेची निवडणूक एका प्रभात दोन नगरसेवक की, एक प्रभाग एक नगरसेवक अशी होणार याबाबत स्पष्टता नसल्यामुळे ओबीसी समाजाचे किती नगरसेवक सभागृहात असतील याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. प्राप्त माहितीनुसार नव्या सभागृहात किमान 68 नगरसेवक असू शकतात. त्यामुळे ओबीसी समाजाच्या नगरसेवकांची संख्या 18 ते 19 असू शकते, अशी शक्यता जाणकारांमधून वर्तविण्यात येत आहे.

ओबीसींना आरक्षण लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने इचलकरंजी शहरातील ओबीसी प्रवर्गात आनंदाचे वातावरण आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून, ओबीसी समाज पुन्हा राजकीय प्रवाहात आला आहे.
– विठ्ठल चोपडे, माजी सभापती, पाणीपुरवठा समिती.

Back to top button