कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसपुढे आव्हान? | पुढारी

कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसपुढे आव्हान?

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मंडलिक व माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसपुढे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. नव्या राजकीय समीकरणामुळे महाडिक, मंडलिक एकत्र येणार असल्यामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, या बालेकिल्ल्यात काँग्रेसला धक्का देण्याचे काम सन 2014 मध्ये भाजपचे अमल महाडिक यांनी केले आहे. परंतु, 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला आपली जागा राखता आली नाही. काँग्रेसने पुन्हा हा गड आपल्या ताब्यात घेतला. या परिस्थितीमुळे या मतदारसंघातील लढत काँग्रेस-भाजप अशी जरी वाटत असली तरी या मतदारसंघात प्रत्यक्षात लढत ही आ. सतेज पाटील विरुद्ध महाडिक गटातच असते.

लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक अशी लढत झाली होती. मंडलिक हे शिवसेना तर महाडिक राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत महाडिक यांचा पराभव करत मंडलिक विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना काँग्रेसच्या आ. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करण्याऐवजी त्यांनी शिवसेनेचे मंडलिक यांना ‘आमचं ठरलंय’ म्हणत मदत केली. त्यावेळी ‘आमच ठरलंय’ संपूर्ण राज्यात गाजले होते. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काही दिवसांतच महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने धनंजय महाडिक यांना तर शिवसेनेने गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेत काम करणारे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली. या चुरशीच्या निवडणुकीत महाडिक विजयी झाले. यामुळे महाडिक गटाला चांगलेच बळ मिळाले. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, गोकुळ येथील सततच्या पराभवामुळे खचलेल्या महाडिकगटाच्या कार्यकर्त्यांनी राज्यसभेतील विजय टनाने गुलाल उधळत साजरा केला.

राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा कायम शत्रू नसतो. हे अनेकवेळा पहावयास मिळाले आहे. कोल्हापुरातही आता हे चित्र मंडलिक यांच्यामुळे पहावयास मिळाले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना बेंटेक्स म्हणणारे मंडलिक आठ दिवसांतच ज्यांना बेंटेक्स म्हणून संबोधले त्यांच्याच पंक्तीत जाऊन बसले. मंडलिक यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गट स्वतंत्र दिसत असला तरी त्या गटाची सूत्रे सगळी भारतीय जनता पार्टीकडे आहेत. हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसपुढे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

Back to top button