कोल्हापूर जिल्ह्यात आता ‘एमएमएम’ आघाडी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात आता ‘एमएमएम’ आघाडी

कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने जिल्ह्यात आता धनंजय महाडिक, संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या ‘एमएमएम’ आघाडीचे राजकारण सुरू होणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी महादेवराव महाडिक, अरुण नरके व पी. एन. पाटील यांची ‘मनपा’ आघाडी गाजली होती. आता ‘एमएमएम’ आघाडी कितपत परिणामकारक ठरणार अशीही चर्चा आहे.

संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात भाजपला ताकद मिळाली आहे. कारण, राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार आहे. संजय मंडलिक यांच्या पक्ष प्रवेशात विनय कोरे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी पुढील राजकीय वाटचालीत आपली जागा पक्की करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असले तरी यामागे अजून काही कारणे असण्याची शक्यता आहे. या कारणांमध्ये मंडलिक यांचा कारखाना, माने यांच्या बंधूंचा टेक्स्टाईल पार्क याचबरोबर पुढील लोकसभा निवडणुकीत भरभक्कम आधार याची चर्चा सुरू आहे.

मंडलिक यांना शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत झाली आणि कोल्हापुरातून धनुष्यबाण दिल्लीला गेला. राजू शेट्टी यांनी भाजपविरोधी घेतलेली भूमिका त्यांना अडचणीची ठरली व धैर्यशील माने विजयी झाली.

राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार आहे. धनंजय महाडिक भाजपचे खासदार आहेत, तर संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा 2 लाख 70 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र, नव्या राजकीय घडामोडीत त्यांच्यात संवाद सुरू झाला आहे. आता हा संवाद आघाडीच्या पातळीवर जाईल. त्यामुळे महाडिक-मंडलिक-माने अशी नवी एमएमएम आघाडी जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर कोणते स्थान पटकावणार याची चर्चा आहे.

‘आमचं ठरलंय’ म्हणून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी ज्या ताकदीने महाडिक यांच्या विरोधात मंडलिक यांना साथ दिली, त्या भूमिकेला तडा गेला आहे. तर धैर्यशील माने हेही शिंदे गटात गेल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. या दोन्ही खासदारांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकारण नव्या वळणावर जाणार आहे. हे वळण काय असेल ते पुढच्या अनेक घडामोडींवर अवलंबून असेल. तूर्त मात्र ‘मनपा’च्या धर्तीवर जिल्ह्यात मंडलिक, महाडिक, माने अशी नवी ‘एमएमएम’ आघाडी अस्तित्वात येणार, अशी चर्चा आहे. गोकुळ, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, काही पंचायत समित्या व बाजार समितीवर यापूर्वी ‘मनपा’ आघाडीचे वर्चस्व होते. त्यावेळी एका नेत्याने जिल्ह्यात जो नवा राजकीय त्रिकोण तयार झाला. त्याने भल्या भल्या नेत्यांना घरातच जेरबंद केल्याची बोचरी टीका केली होती.

Back to top button