रुग्णालय प्रशासनाने रुग्णांचे स्थलांतर करावे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार | पुढारी

रुग्णालय प्रशासनाने रुग्णांचे स्थलांतर करावे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : महापुराचे पाणी ज्या रुग्णालयात शिरते तेथील रुग्णांचे ऐनवेळी हाल होऊ नयेत, यासाठी रुग्णालय प्रशासनाने अशा रुग्णांचे स्थलांतर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. प्रशासनाने दिलेल्या पर्यायी जागांवर नागरिकांनी स्थलांतर करावे, असे आवाहनही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

रेखावार म्हणाले, महापुराचे पाणी क्षणात वाढते. पावसामुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक हॉस्िपटलमध्ये पुराचे पाणी आले. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडते. रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, प्रशासन सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील रुग्णांना पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करण्याची धावपळ होते. यामुळे रुग्णालय प्रशासनाने स्वतःकडील बोटी तयार ठेवाव्यात, रुग्णांना कोणत्या ठिकाणी स्थलांतरित करायचे याचे पूर्वनियोजन करावे, असे सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील आपत्ती काळात प्रत्येक तालुक्यात हेलीपॅडची व्?यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे. नुकताच शिरोळ तालुक्यात दौरा झाला. त्या ठिकाणी कुरूंदवाड, कवठेगुलंद, तेरवाड या ठिकाणी शाळांची क्रीडांगणे, साखर कारखान्यांची रिकामी जागा, शासकीय जागांची माहिती घेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच अधिकार्‍यांना व्हीसीद्वारे संभाव्य पूरस्थितीची काय परिस्थिती आहे, नियोजन काय झाले आहे, याची माहिती घेतली जात आहे. कोणी कोठे स्थलांतर व्हायचे आहे, याचे नियोजन झाले आहे. अनेक पूरग्रस्तांनीही प्रशासन सांगेल त्या वेळेला स्थलांतर करणार असल्याचे आश्?वासन दिल्याचेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.

शाळांना सुट्टी द्या : खा. महाडिक

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना 16 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्?याकडे केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येण्याची शक्यता आहे.

पाऊस आणि थंड हवामान याचा विपरीत परिणाम होऊन शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मुले पुराच्या पाण्यातून धोकादायकरीत्या प्रवास करत शाळेला येतात. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शाळांना 14 ते 16 जुलैदरम्यान सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केली.

नागरिकांनी वेळीच स्थलांतरित व्हावे : आ. जाधव

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ. जयश्री जाधव यांनी शहरातील शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर परिसरात महापालिका अधिकार्‍यांसह भेट देऊन पाहणी केली. पूरस्थितीबाबत नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. पूर येणार्‍या भागातील नागरिकांनी वेळीच स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले.

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शाहूपुरी व व्हिनस कॉर्नर परिसरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आ. जाधव यांनी शाहूपुरीतील पंचमुखी गणेश परिसर, कुंभार गल्ली येथे पाहणी केली. गाडीअड्डा येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून दलदल झाली आहे. या ठिकाणी काँक्रिटीकरण करून पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना दिल्या. पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने सुतारवाड्यातील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, रमेश पुरेकर, पूजा नाईकनवरे, अमर समर्थ, अमर देसाई, संभाजी पवार उपस्थित होते.

जिल्हा न्यायालयात पूरग्रस्त मदत केंद्र

जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालयात मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास या केंद्राची मदत घ्यावी, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. सी. चांडक, सचिव प्रीतम पाटील यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आलेल्या या मदत केंद्रात पुरामुळे होणारे नुकसान मौल्यवान दस्तऐवज पुनर्बांधणी विम्यासंबंधीचे दावे, कायदेशीर हक्क, वैद्यकीय, आरोग्य विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच नुकसान पोहोचलेल्या पीडितांचे समुपदेशन करण्?यात येणार आहे. महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, अन्य संबंधित शासकीय कार्यालय, तसेच भारतीय वैद्यकीय संघटना यांच्याशी समन्वय साधून सर्व मदत केली जाईल .राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मदतीसाठी मुख्य गटाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये न्यायाधीश, विधिज्ञ व डॉक्टर यांचा समावेश आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी 0231- 2541295 किंवा 8591903609 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी 27 टँकर

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील पूरबाधित गावांना आवश्यकता भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने केले आहे. पहिल्या टप्प्यात 27 टँकर तयार ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, अद्याप जिल्ह्यातील सर्व गावांचा पाणीपुरवठा सुरळीत असल्याचे सांगण्यात आले. गावातील नळ पाणीपुरवठा योजनांना भेटी देऊन त्यांची महिती घ्यावी. त्याचाअहवाल मुख्यालयाला सादर करण्याच्या सूचना शाखा अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींमध्ये बसविण्यात आलेली शुद्ध पाणी विक्री केंद्रे सुस्थितीत ठेवण्याबाबतही ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे.

Back to top button