कोल्हापूर: शिरटीतील 'त्‍या' शिक्षकाविरोधात निदर्शने; शाळेला कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा | पुढारी

कोल्हापूर: शिरटीतील 'त्‍या' शिक्षकाविरोधात निदर्शने; शाळेला कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा

शिरटी : पुढारी वृत्तसेवा : येथील ज्ञानदीप शिरटी शिक्षण संस्थेच्या शिरटी हायस्कूलची विद्यार्थिनी सानिका माळी हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेले संशयित शिक्षक निलेश बाळू प्रधाने यांना शाळेत हजर करून घेऊ नये, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी हायस्कूलसमोर शिक्षकाविरोधात जोरदार निदर्शने केली. त्याचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. शिक्षण संस्थेने त्या शिक्षकाला पाठीशी घातल्यास शाळेलाही कुलूप ठोकू, असा सज्जड इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

२० फेब्रुवारी २०२० रोजी सानिका हिला शाळेत पाण्याची बाटलीतील पाणी पिल्यानंतर विषबाधा झाली होती. त्यानंतर उपचार सुरू असताना हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शाळेतील शिक्षक प्रधाने याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. कामगार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तो पुन्हा शाळेत दि.८ जुलै रोजी हजर झाला आहे. प्रधाने शाळेत हजर झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ आक्रमक झाले.

रविवारी ग्रामस्थांनी संस्थेच्या संचालकांसह ग्रामसभा घेऊन सोमवारी त्या शिक्षकाला शाळेत येऊच द्यायचे नाही, असे ठरवले. त्यानुसार आक्रमक होऊन शेकडो नागरिक सकाळी १० वाजता संस्थेसमोर उपस्थित झाले. मात्र, तो शिक्षक सोमवारी सकाळी शाळेत हजर झाला नाही. त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्याचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला.  उद्या देखील ग्रामस्थांनी सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे ठरवले आहे. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष संतोष पाटील, माजी सरपंच प्रकाश उदगावे, रामगोंडा पाटील, सचिन खोबरे, राजकुमार कोगनोळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी, रामदास भंडारे, अभयकुमार गुरव यांची भाषणे झाली. यावेळी ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button