अनिल देशमुख यांना दिलासा नाही! विशेष सीबीआय कोर्टाने जामीन नाकारला | पुढारी

अनिल देशमुख यांना दिलासा नाही! विशेष सीबीआय कोर्टाने जामीन नाकारला

मुंबई; पुढारी ऑनलाईन : भ्रष्टाचार प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. अनिल देशमुख यांचे जवळचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांचेही जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. २०१९ ते २०२१ या कालावधीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

वकील जयश्री पाटील यांनी केलेल्या तक्रारीच्या प्राथमिक तपासातील निष्कर्षांच्या आधारे सीबीआयने देशमुख आणि इतरांवर आरोप ठेवले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ५ एप्रिल २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणी याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोव्हेंबर २०२१ मध्ये देशमुख आणि इतरांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना सीबीआयने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ताब्यात घेतले होते. त्यांना १६ एप्रिलपर्यंत सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तपास यंत्रणेचे आरोपपत्र अपूर्ण आहे आणि तपास पूर्ण झाला नसल्याचा दावा करत देशमुख यांनी जामिनासाठी (default bail) अर्ज केला होता.

सीबीआयच्या वतीने त्यांच्या जीमान अर्जाला विरोध करताना, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंह यांनी, आरोपपत्र पूर्ण झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले.

Back to top button