‘पुढारी’ आरोग्य संवाद : आयुर्वेद ही समृद्ध जीवनशैली | पुढारी

'पुढारी’ आरोग्य संवाद : आयुर्वेद ही समृद्ध जीवनशैली

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : काय खावे, काय टाळावे, कधी खावे, कधी खाऊ नये, कधी झोपावे, कधी झोपू नये, किती पाणी प्यावे, कधी पाणी प्यावे आदी दैनंदिन सर्वच प्रश्नांची उत्तरे अर्थात दिनचर्या, ऋतुचर्या कशी असावी हे सांगणारी आयुर्वेद ही समृद्ध जीवनशैली असल्याचे आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. परीक्षित शेवडे यांनी रविवारी सांगितले. दैनिक ‘पुढारी’च्या वतीने ‘डॉक्टर्स डे’निमित्त आयोजित ‘आरोग्य संवाद’ या ऑनलाईन व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ‘आयुर्वेद आणि जीवन’ या विषयावर त्यांनी विवेचन केले. डॉ. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेध, ज्ञान असे म्हटले जाते. ती समृद्ध परंपरा मानली जाते. भारतीय संस्कृतीमधील पाचवा वेद असेही आयुर्वेदाला म्हटले जाते, असे सांगत डॉ. शेवडे म्हणाले, अनेकदा अखेरचा प्रयत्न म्हणून आयुर्वेदाकडे पाहिले जाते. त्यामुळे आपण शरीराची प्रयोगशाळा करून बसलो आहोत; पण आयुर्वेद हे आपले प्राचीन आणि मूलभूत शास्त्र आहे. ते पिढ्यान् पिढ्या चालत आले आहे. ते आपल्या रक्तात भिनलेले आहे. त्यामुळे आयुर्वेदाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. तो प्रभावी पर्याय आहे.

आयुर्वेदाने शरीरावर दुष्परिणाम होतात, हा गैरसमज आहे, असे सांगत डॉ. शेवडे म्हणाले, रुग्ण आल्यानंतर आयुर्वेदिक उपचार करणार्‍यांपुढे दोन आव्हाने असतात. संबंधित रुग्णांची त्याला असलेल्या आजाराने आतापर्यंत किती हानी झाली आहे आणि यापूर्वीच्या अन्य पॅथीतील औषधांनी काही साईड इफेक्ट आहेत का, याचा विचार करून आयुर्वेदिक औषध द्यावे लागते. आपण आयुर्वेदिक औषध घेतो म्हणजे नेमके काय करतो, हे समजावून घेतले पाहिजे. आयुर्वेद म्हणून गावठी औषधे, मुळ्या, झाडपाला घेणे टाळले पाहिजे. ज्या व्यक्तीकडे कोणतीही अधिकृत पदवी नाही, त्याने ते औषध कसे बनवले आहे, कुणासाठी बनवले आहे, हे माहीत नाही. त्यामुळे होणारे दुष्परिणाम आयुर्वेदाचे कसे असतील? आयुर्वेदातही ‘धातू’चा वापर होतो. मात्र, त्यापासून भस्म तयार करण्याची मोठी प्रक्रिया आहे. त्याच्या चाचण्याही घेतल्या जातात. त्यानुसार औषधाचा कालावधी आणि मात्रा ठरते. यामुळे ही औषधे ठरलेल्या मात्रेच्या दहापट जरी जादा सेवन केली, तरी त्याचे दुष्परिणाम दिसत नाहीत, असेही डॉ. शेवडे यांनी सांगितले.

‘स्वस्थस्य स्वास्थ रक्षण; आतुरस्य विकार प्रशमन:य’ असे म्हणजे जो निरोगी आहे, त्याच्या आरोग्याची रक्षा करणे आणि ज्याला आजार आहे, त्याचे निवारण करून त्याला निरोगी बनवणे म्हणजेच आयुर्वेद आहे, असे सांगत डॉ. शेवडे म्हणाले, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आयुर्वेद हे चांगले शास्त्र तर आहेच; पण ते उपचारासाठीही फायदेशीर आहे. मानवी प्रकृती ही वात, पित्त आणि कफ या तीन प्रकारांत असते. यामुळे आयुर्वेदात सर्वांनाच एकसारखे औषध दिले जात नाही. कोणत्या प्रकृतीत काय झाले, त्यावर सूक्ष्म पातळीवर परीक्षण करून आयुर्वेदात मार्ग सांगितले आहेत. यामुळे आयुर्वेदाचे जे शुद्ध आणि योग्य प्रॅक्टिस करत असतात, त्यांचा सल्ला घेणे आवश्यक असते, असेही त्यांनी सांगितले. आयुर्वेद हे एका रात्रीत जन्मलेले शास्त्र नाही. त्यात प्रत्येक काळानुसार संशोधनाची भर घातली गेली आहे. आयुर्वेदाला संशोधनाचे कधीच वावडे नव्हते. पूर्वीच्या सिद्धांतानुसार त्यात सातत्याने संशोधन होत आहे. कोरोनानंतरच्या काळात तर त्यामध्ये अधिक भर पडल्याचेही डॉ. शेवडे यांनी सांगितले.

देशी गाय ही आपली संस्कृती होती. आपल्या जीवनात, आरोग्याच्या दृष्टीने या देशी गायींचे महत्त्व आहे, असे सांगत डॉ. शेवडे म्हणाले, अनेक संशोधनातून देशी गायीचे आरोग्यद़ृष्ट्या महत्त्व समोर आले आहे. देशी गायीचे दूध, तूप हे आरोग्याच्या द़ृष्टीने प्रचंड उपयुक्त आहे. वृद्धांसाठी तर हे तूप टॉनिकसारखे काम करते. यामुळे देशी गायींच्या उपयुक्ततेबाबत दंतकथा होण्याऐवजी त्यामागील शास्त्र सांगितले पाहिजे, असेही डॉ. शेवडे यांनी सांगितले.

मधुमेहाच्या बॉर्डर लाईनवर असताना गुळाचे सेवन करावे का, सांधेदुखी कमी होण्यासाठी उपाय काय, कोणती फळे खावीत आणि कोणती खाऊ नयेत, पित्त विकार असलेल्यांनी कोणते पदार्थ टाळावेत, पाणी कधी आणि किती प्यावे, मांसाहार किती करावा, रात्री किती वाजता झोपावे, किती झोप घ्यावी, वृद्धांनी कोणती काळजी घ्यावी, मासिक पाळीशी संबंधित आजारांबाबत आयुर्वेद काय सांगते, नाकात तूप घालावे का आदी ऑनलाईन सहभागी व्यक्तींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे डॉ. शेवडे यांनी निरसन केले.

निरोगी राहण्यासाठी हे कराच

विरुद्ध आहार घेऊ नका. जेवण वेळेवर करा, रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवा, दररोज तीन-चार चमचे देशी गायीचे तूप वापरा. तहान लागली की, तहान शमेल एवढेच पाणी प्या. उठल्यावर, झोपताना जास्त पाणी घेऊ नका. एसीत बसणार्‍यांनी जेवणात कोमट पाणी घ्यावे. दुपारची झोप टाळा. शक्यच नसेल, तर बसल्या ठिकाणी झोप घ्या. कमी मसाले वापरा, हिरव्या मिरच्यांचा वापर टाळा. जागरण टाळा, शक्यतो चहा टाळा, घ्यायचाच असेल, तर भरल्या पोटावर घ्या. सर्व व्यसने टाळा. कुटुंबाला वेळ द्या, घाम येईपर्यंतच व्यायाम करा, मोकळ्या हवेत व्यायाम करा, जादा व्यायाम करू नका, असा सल्ला डॉ. शेवडे यांनी दिला.

लहानपणासूनच आयुर्वेदाची आवड लावा

लहान मुलांना बालपणापासूनच आयुर्वेदाची आवड लावा. आयुर्वेदात जी साधी, सोपी पथ्ये सांगितले आहेत, ती पाळायला शिकवा. शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्माचीही जोड द्या, असे आवाहनही डॉ. शेवडे यांनी यावेळी केले.

आजचे व्याख्यान

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे मेरी-क्यूरो फेलो डॉ. नानासाहेब थोरात, विषय : कशी कराल कॅन्सरवर मात? वेळ : सायंकाळी 6 वाजता, ‘पुढारी’ ऑनलाईन.

Back to top button