‘पुढारी आरोग्य संवाद’ : जिभेसाठी नको, हृदयासाठी खा : कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट डॉ. ऋतुपर्ण शिंदे | पुढारी

‘पुढारी आरोग्य संवाद’ : जिभेसाठी नको, हृदयासाठी खा : कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट डॉ. ऋतुपर्ण शिंदे

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : जे जिभेला चमचमीत लागते, ते हृदयासाठी चांगले नसते. यामुळे जिभेसाठी नको, चांगल्या हृदयासाठी खा. अन्न संस्कृती जपा, अन्न साक्षरता वाढवा, खाण्याच्या पद्धती बदला, असा सल्ला प्रसिद्ध कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी शनिवारी दिला. दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘डॉक्टर्स डे’निमित्त आयोजित ‘आरोग्य संवाद’ या ऑनलाईन कार्यक्रमात ‘निरोगी हृदयाची गुरुकिल्ली’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. डॉ. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

हृदयविकाराने घाबरू नका; मात्र त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, दक्षता घ्या, असे सांगत डॉ. शिंदे म्हणाले, हृदयविकाराचा धक्का आणि हृदय बंद पडून अचानक मृत्यू होणे, यामध्ये फरक आहे. हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर लगेचच मृत्यू होत नाही. हृदयविकाराचा धक्का जीव वाचवण्यासाठी काही वेळ देतो. हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होत जातो आणि नंतर बंद होतो. जबड्यापासून बेंबीपर्यंतच्या भागात तीव— वेदना होतात अथवा छातीजवळ खूप दुखते. घाम सुटतो, कधी डावा हात दुखतो. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तत्काळ जवळच्या रुग्णालयात जा. ईसीजी काढा आणि डॉक्टरांच्या सल्लाने उपचार घ्या. स्वत: डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

हृदय बंद पडून मृत्यू होतो; मात्र त्यावेळी केवळ तीन मिनिटांचाच वेळ असतो, अशावेळी ‘सीपीआर’ या प्रथमोपचार प्रणालीचा वापर केला, तर 75 ते 80 टक्के रुग्णांचा जीव वाचण्याची शक्यता असते. याकरिता या प्रणालीचे प्रशिक्षण सर्वांना असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

योग्य आहार, विहार आणि आचार-विचारांचा समतोल राखला, तर हृदयरोगावर मात करता येते, असे सांगत डॉ. शिंदे म्हणाले, अँजिओप्लास्टी, बायपास या उपचार प्रणाली म्हणजे, स्वल्पविराम आहेत. हृदयविकाराला पूर्णविराम द्यायचा असेल, तर जीवनशैली बदलली पाहिजे. ‘डायट’चे सध्या फॅड आहे. ते कमी झाले पाहिजे. आहाराबाबत अनेक गैरसमज आहेत, ते दूर झाले पाहिजेत. जेवणाचा पॅटर्न बदलला पाहिजे. सकाळी भरपूर, दुपारी मध्यम आणि सायंकाळी कमी खाल्ले पाहिजे. विशेषत:, घरचे अन्न खाल्ले पाहिजे. कोलेस्टेरॉल म्हणजे एकप्रकारचा व्हिलनच आहे, याची जाणीव असू द्या. मधुमेह हा रुग्णचंबुक आहे, तो किमान 20 रोग सोबत आणतो. तो साखरेचा नाही, तर वजनाचा रोग आहे. मधुमेहानंतर हृदयविकाराचा धोका असतो. यामुळे आपली अन्न संस्कृती जपा, अन्नाबाबत साक्षर व्हा, असे आवाहनही डॉ. शिंदे यांनी केले.

तपासण्यांच्या पॅकेजचा सुळसुळाट सुरू आहे, त्याला बळी पडू नका. वयाच्या चाळिशीनंतर दोन वर्षांत एकदा केवळ प्राथमिक तपासण्या करा. रक्तातील शुगर, कोलेस्टेरॉल, क्रिएटिन, थायरॉईड, हिमोग्लोबीन आणि सीबीसी तसेच युरिनची रुटिन तपासणी, ईसीजी, टू-डी इको आणि छातीचा एक्स-रे इतक्याच तपासण्या करा, असे सांगत डॉ. शिंदे म्हणाले, अँजिओग्राफीचाही अतिरेक झाला आहे. ती एक तपासणी आहे. अँजिओप्लास्टी ही उपचार पद्धती आहे. ब्लॉकेज 75 टक्क्यांपेक्षा कमी असतील, तर अँजिओप्लास्टीची गरज नाही. ब्लॉकेज 90 टक्क्यांपेक्षा जादा असल्यास अँजिओप्लास्टी करावी लागते. मात्र, 75 ते 90 टक्क्यांपर्यंत ब्लॉकेजचे प्रमाण असेल, तर रुग्णांनी सेकंड ओपिनियन जरूर घ्यावे, ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

लहान मुलांबाबत पालकांनी अधिक जागरूक राहावे, त्यांच्यात किमान एक तरी स्पोर्टस् अ‍ॅक्टिव्हिटी सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. त्यांच्या जेवणावर लक्ष द्यावे, त्यांच्या मनावर चांगले संस्कार कसे होतील, याकडेही पाहावे, असे सांगत डॉ. शिंदे म्हणाले, योग्य आहाराबरोबरच व्यायाम आणि चांगल्या आचार-विचारांचीही गरज आहे. हृदयरुग्णांची क्षमता तपासून त्यांचा व्यायाम निश्चित करणे आवश्यक आहे. प्राणऊर्जा प्रकल्पाद्वारे व्यायामाची क्षमता तपासून, त्याची चाचणी घेऊन, त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. 12 आठवड्यांचा कोर्स दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. शिंदे यांनी उत्तरे देत, त्यांच्या शंकांचे निरसन केले. डॉ. संदीप पाटील यांनी सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न, शंका सहजपणे मांडत हा कार्यक्रम खुलवला. यावेळी मोबाईल वापर, सीटी अँजिओग्राफी, स्टेंट वापर आदी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

‘पुढारी’चा ‘आरोग्य संवाद’ कार्यक्रम उपयुक्त ठरेल

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील दुरावा वाढत आहे, तो केवळ संवादाच्या अभावामुळे आहे. ‘पुढारी’ने सुरू केलेल्या ‘आरोग्य संवाद’ या कार्यक्रमाचा मूळ उद्देशच दुरावा कमी व्हावा, असा आहे. या कार्यक्रमामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

‘सीपीआर’ प्रणालीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा

हृदय बंद पडलेल्या व्यक्तीला 15 वर्षांचा मुलगाही ‘सीपीआर’ प्रणाली देऊ शकतो. मात्र, त्याबाबतची जनजागृती आणि प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. या उपचार प्रणालीबाबत विद्यार्थिदशेतून माहिती होणे आवश्यक आहे. याकरिता शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश झाला पाहिजे. यासाठी ‘पुढारी’ने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. शिंदे यांनी केले.

फॅमिली डॉक्टर ही संकल्पना हवीच

गेल्या काही वर्षांपासून फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कमी होत चालली आहे. ही संकल्पना रुग्णांसाठी अंत्यत आवश्यक आहे. ती वाढली पाहिजे, असे सांगत प्रत्येक पॅथीचा रुग्णांसाठी उपयोग होत असतो, ते एकमेकांसाठी पूरक ठरले पाहिजेत, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

आजचे व्याख्यान

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. परिक्षित शेवडे, विषय- आयुर्वेद आणि जीवन. वेळ : सायंकाळी 6.00 वाजता ‘पुढारी’ ऑनलाईन.

 

हेही वाचलंत का ?

Back to top button