‘व्हीप’वरून विधानसभेत आज खडाजंगीची शक्‍यता…

‘व्हीप’वरून विधानसभेत आज खडाजंगीची शक्‍यता…
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी आमने- सामने आहेत. अध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना आणि शिंदे गटाने पक्षादेश (व्हीप) जारी केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीवेळी कोणाचा व्हीप ग्राह्य धरला जाणार यावरून सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना सभागृहात उपस्थित राहून राजन साळवी यांनाच मतदान करावे,असा व्हीप जारी केला आहे. तर बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते भरत गोगावले यांनीही व्हीप बजावला असून या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याने आमचाच व्हीप लागू असेल, असा दावा केला आहे. 16 आमदारांनी आमच्या व्हीपचे पालन केले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला परवानगी दिली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने राज्यपालांनी आघाडी सरकारला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यास परवानगी नाकारली होती. मात्र नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारला अध्यक्ष निवडणूक घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना निवडणुकीला परवानगी कशी? या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ होऊ शकतो.

काय चालले हे जनतेला दिसत आहे : जयंत पाटील
आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या असे राज्यपालांना सांगत होतो. मात्र त्यांनी निवडणूक लावली नाही. आता नवीन सरकार सत्तेत येताच अध्यक्षपदाची निवडणूक लावली आहे. यावरून काय चाललंय हे जनतेला दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news