आला पावसाळा… आता आरोग्य सांभाळा | पुढारी

आला पावसाळा... आता आरोग्य सांभाळा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा ; पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणार्‍या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असते. घरातील प्यायचे पाणी वगळता अन्य स्रोतांपासून मिळणार्‍या पाण्याच्या शुद्धतेबद्दल खात्री देता येत नाही. नियमित वापरातील पाण्यावर किमान तुरटी फिरवून ते वापरावे. अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे जलजन्य आजार पावसाळ्यात डोके वर काढतात. लहान मुलांना त्याची लगेचच बाधा होते. पाऊस थांबल्यानंतर साचलेल्या पाण्यामुळे मलेरियाचा फैलावही अधिक होतो.

बदलत्या वातावरणाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे काही प्रमाणावर काळजी घेणे आवश्यक आहे. आपण प्रवासात बस, ट्रेनमध्ये चढता-उतरताना, ऑफिसमध्ये, मार्केट, शाळेत, कॉलेजमध्ये आपले हात आपल्या नकळत जीवाणू जमा करत असतात. त्यामुळे बाहेरून घरी पोहोचल्यावर काही खाण्याआधी किंवा जेवणाआधी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

पोषक आहार घ्यावा

पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे सकस, शुद्ध, पोषक घरचे अन्नच खावे. भाज्या, फळे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत होते. या गोष्टींचा आपल्या रोजच्या आहारात भरपूर समावेश करावा. मसाल्याचे पदार्थसुद्धा पचनाला मदत करतात. पण, पावसाळ्यात खूप तिखट पदार्थ खाणे टाळावे.

उघड्यावरचे अन्न खाणे टाळा

पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. बॅक्टेरिया, व्हायरेसेसचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. अनेकदा पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले पाणी नीट गाळलेले नसते. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या खाण्यावर माश्या बसून ते अन्न दूषित करतात. त्यामुळे बाहेरचे अन्न खाने टाळावे.

डासांपासून सुरक्षित राहा

पावसाळ्यात डासांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डासांपासून सुरक्षेची काळजी घ्या. डासांना दूर ठेवणारे क्रीमचा वापर करा. घरात किंवा घराच्या आसपास पाणी फार काळ साठून राहणार नाही, याची काळजी घ्?या. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरतात.

प्रतिकार शक्ती वाढवा

लसूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. सर्दी खोकला, ताप अशा आजारांपासून सहज संरक्षण मिळते. तसेच मिरपूड, आले, हिंग, हळद, कोथिंबीर, जीर, लिंबू पचनसंस्था नीट काम करण्यासाठीदेखील मदत करतात.

पाणी उकळून प्या

स्वास्थ्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी शरीरातील टॉक्सिन्सचा नीट निचरा होण्यासाठी दिवसभरात 3 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी उकळून थंड करून वस्त्रगाळ करून प्यावे.

Back to top button