गणरायाच्या आगमनाची सोशल मीडियावर आतुरता | पुढारी

गणरायाच्या आगमनाची सोशल मीडियावर आतुरता

कोल्हापूर ; आशिष शिंदे : प्रत्येक सरत्या दिवसागणीक बाप्पांच्या आगमनाची आतुरता गणेशभक्तांमध्ये पाहायला मिळत आहे. यंदा 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. मात्र, सोशल मीडियावर आतापासूनच बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सुरू झाला आहे. कोरोनाला मागे सारून गणेशोत्सव यंदा पुन्हा त्याच अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी सारे सज्ज झाले आहेत. इंटरनेटच्या दुनियेत आतापासूनच गणरायाच्या आगमनापासून ते स्वागताच्या तयारीपर्यंतचे प्लॅनिंगचे फोटो, मेसेज, व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. बाप्पांच्या आगमनाला राहिले केवळ 78 दिवस… अशा प्रत्येक सरत्या दिवसाच्या पोस्ट फेसबुक, इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होऊ लागल्या आहेत.

त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीतील डोळे दीपवणारे प्रकाश झोत, अखंडपणे ओसंडून वाहणारा उत्साह, मोरयाचा गजर, कोल्हापूरच्या मिरवणुकांचे वैशिष्ट्य असलेल्या आबालवृद्ध आणि मुलींनी सादर केलेले मर्दानी खेळाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. विशेषत:, बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी या क्राऊड पुलर महाद्वार रोडवरील व्हिडीओज्ना नेटकर्‍यांमध्ये सर्वाधिक पसंती आहे. या व्हिडीओज्ना लाखो व्ह्यूअर्स आहेत.

यंदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा होणार असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मंडळांच्या सोशल मीडिया पेजवर मूर्ती घडण्यापासूनचा प्रत्येक क्षण कॅमेराबद्ध करून पोस्ट केला जात आहे. याशिवाय आपल्या मंडळाचा आगमन सोहळा, आरत्या, पूजेचे व्हिडीओ शेअर केले जात आहेत.

राहिले केवळ 78 दिवस

गणरायाच्या आगमनाला राहिले के?वळ 78 दिवस…. प्रत्येक सरत्या दिवसागणीक अशा पोस्ट प्रत्येक तालीम मंडळांकडून आपल्या गणरायाच्या फोटोसह सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. यामुळे आतुरता गणरायाची हा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंगवर आहे.

Back to top button