कोल्हापूर : स्कूल बसमधील विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! | पुढारी

कोल्हापूर : स्कूल बसमधील विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

कोल्हापूर ; प्रवीण मस्के : इचलकरंजी येथे झालेल्या स्कूल बसच्या अपघाताने पुन्हा एकदा शाळा सुरू होण्याच्या तोंडावर विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून 15 जूनला शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर उपायोजना राबविण्याबरोबरच समन्वयाची गरज आहे.

गेल्या काही वर्षांत स्कूल बस अपघातात अनेक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. याची गंभीर दखल घेत शासनाने राज्यातील स्कूल अपघाताच्या अनुषंगाने 2013 मध्ये शालेय स्कूल बस धोरण मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यात स्कूल बसमधील आसन क्षमता, कंत्राटी स्कूल बससाठी वाहनांचा रंग, शाळेचे नाव, प्रवास करणार्‍या मुलांची यादी, घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास आदी मार्गदर्शक सूचनांचा यात समावेश आहे. सर्व शाळांना या मार्गदर्शक सूचना व तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश आहेत.

कोरोनानंतर यावर्षी शाळा वेळेत सुरू होणार आहेत. त्या अनुषंगाने शाळांची तयारी सुरू झाली आहे. नुकताच इचलकरंजी येथे स्कूल बस आणि एसटीचा अपघात झाला. यात स्कूल बस चालकासह विद्यार्थी आणि एसटीतील प्रवासी जखमी झाले. यामुळे मात्र स्कूल बसमधून शाळेला जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. विद्यार्थी वाहतुकीबाबत वारंवार घडणार्‍या घटनांमुळे पालक, शाळा व्यवस्थापनाच्या अडचणीत वाढ होत आहे. आरटीओ, वाहतूक पोलिस, शाळा प्रशासन, शिक्षक, पालक, बसचालक-मालक यांनी विद्यार्थी सुरक्षेचा विषय समन्वयाने हाताळण्याची गरज आहे.

स्कूल बस नियमावली…

* बसमधून मुलांना सुरक्षित उतरण्यासाठी जागेची तरतूद असावी.

* वाहन चालविण्याचा पाच वर्षांचा चालकास अनुभव असावा.

* वाहनाच्या खिडकीस तीन बार असावेत.

* प्रत्येक स्कूलबसमध्ये स्पीड गव्हर्नस बसवणे गरजेचे.

* दप्तर ठेवण्यासाठी पायाजवळ रॅक असावा.

* मुलींसाठी बसमध्ये महिला सेविकेची नियुक्ती असावी.

* स्कूल बसला इमर्जन्सी एक्झिट डोअर बसविलेले असावेत.

Back to top button