कोल्हापूर महापालिकेचा आखाडा रंगणार | पुढारी

कोल्हापूर महापालिकेचा आखाडा रंगणार

कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : राज्यसभा निवडणुकीतील धनंजय महाडिक यांच्या विजयाने आता महापालिकेचे रणांगणही रंगणार आहे. महापालिका, जिल्हा परिषदेसारखी महत्त्वाची सत्ता केंद्रे काबीज करून महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे.

महापालिकेत भाजपचे कमळ फुलविण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्यातील सत्तेच्या काळात पालकमंत्री असतानाही महापालिकेत भाजपची सत्ता आणता आली नाही. शिवसेनेने साथ न दिल्याने तेव्हा भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते.

आता त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार महापालिका निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पेाटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना 78 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. कदम यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेल्या मतांमुळे भाजपची शहरात ताकद वाढल्याचे दिसत आहे. याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीत घेण्याचा प्रयत्न सुरू असतानाच धनंजय महाडिक यांच्या विजयाने भाजपला आणखी बळ मिळाले आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे; पण महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सगळेच पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. शिवसेना स्वबळावर रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीनेही स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप आणि ताराराणी आघाडी एकत्रितपणे निवडणूक रिंगणात उतरल्यास निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आपापल्या पक्षाची रणनीती ठरवत असतानाच धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर महापालिका निवडणुकीचे रणांगण चांगलेच रंगणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांचा मुख्य विरोधक भाजप आहे. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे राजकीय स्थितीचा अंदाज घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्याविरोधात सर्वच प्रभागांत भाजपचे उमेदवार असतील. भाजपला ताराराणी आघाडीची साथ असेल. ज्या प्रभागात भाजपचे कार्ड चालणार नाही, त्याठिकाणी ताराराणी आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. तर भाजप-ताराराणी आघाडीची धुरा आता खासदार धनंजय महाडिक यांच्या खांद्यावर असणार असून, महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महाडिक यांची युवा शक्तीही पणाला लागणार आहे.

Back to top button