कोल्हापूर : पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर

कोल्हापूर : पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत गुरुवारी दिवसभरात 3 फुटांची वाढ झाली असून गुरुवारी हे पाणी पुन्हा पात्राबाहेर आले. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. जिल्ह्यातील 27 बंधारे पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 15.6 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 51.3 इतका झाला आहे.

दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. बुधवारी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी पावसाने काही काळ विश्रांती घेतली. तरीही नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणात 234.49 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गेल्या आठवड्यात पंचगंगा पाणी पुन्हा पात्रात गेले होते. पण गुरुवारी हे पाणी पुन्हा पात्राबाहेर आले.

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 51.3 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेल्या एकूण पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे : हातकणंगले 3.1 मि.मी., शिरोळ 2.6, पन्हाळा 8.7, शाहूवाडी 20.7, राधानगरी 36.6, गगनबावडा 51.3, करवीर 12, कागल 6.5, गडहिंग्लज 9.4, भुदरगड 26.8, आजरा 16 व चंदगड 19 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

…हे बंधारे गेले पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी – हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. वारणा नदी – चिंचोली, माणगाव व खोची. कासारी नदी – यवलूज, पुनाळ-तिरपण व ठाणे-आळवे. दूधगंगा नदी – दत्तवाड व सिद्धनेर्ली. वेदगंगा नदी – निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली. कुंभी नदी – कळे असे एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत.

Back to top button