कोल्हापूर : जिल्ह्यात शिवरायांच्या विचारांचा जागर | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यात शिवरायांच्या विचारांचा जागर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब—ुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. तिथीप्रमाणे पारंपरिक सोहळा अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. यामुळे शिवजयंतीचा हा सोहळा सोमवार, दि. 2 मे रोजी साजरा केला जाणार आहे. दरम्यान, शिवजयंती सोहळ्यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पेठापेठांमध्ये शिवजयंतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य डिजिटल, भगवे ध्वज-पताका, पोवाडे यातून वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे.

संयुक्त जुना बुधवारतर्फे शिवसप्ताहाचे आयोजन

संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सवाअंतर्गत शिवसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात बुधवारी शिवमूर्ती आगमन सोहळा व प्रतिष्ठापनेने झाली. गुरुवारी (दि.28) रात्री 8 वाजता ‘बाल शिवचरित्र व्याख्यानकार’ ओंकार व्यवहारे यांचे व्याख्यान आणि रात्री ‘शिवभक्त’ मराठी चित्रपटाचे सादरीकरण होणार आहे. शुक्रवारी (दि.29) रात्री 8 वाजता शिवशाहीर रंगराव पाटील व शाहिरी पोवाडा कलामंच आयोजित ‘शंभूराजे’ पोवाडा नाट्याचे सादरीकरण होणार आहे. शनिवारी (दि.30) रात्री 9 वाजता बुजवडे (ता. राधानगरी) येथील ‘श्री विठ्ठल प्रासादिक संगीत सोंगी भजन’ होणार आहे. रविवारी (दि.1 मे) सायंकाठी साडेपाच वाजता मोटार रॅली आणि रात्री 9 वाजता ‘गर्जना महाराष्ट्राची’ हा शिवशाहीर दिलीप सावंत यांचा पोवाडा सादर होणार आहे. सोमवारी (दि.2 मे) सकाळी 10 वाजता शिवजन्मकाळ सोहळा, दिवसभर मोफत आरोग्य शिबिर आणि रात्री 9 वाजता ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाचे सादरीकरण होणार आहे. 3 मे रोजी दुपारी 4 वाजता मिरवणुकीने शिवसप्ताहाची सांगता होणार आहे.

संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळ शिवजयंती

संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवाचे आयोजन मिरजकर तिकटी येथे करण्यात आले आहे. दि.29 रोजी सायंकाळी 6 वाजता उत्सवाचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, राजेश क्षीरसागर, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होईल. रात्री ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचे सादरीकरण होईल. शनिवारी (दि.30) सायंकाळी पंचरत्न शाहीर पथकाचे सादरीकरण आणि रात्री 9 वाजता ‘फर्जंद’ चित्रपटाचे सादरीकरण होईल. रविवारी (दि. 1 मे) महिलांसाठी होम मिनिस्टर आणि रात्री 9 वाजता पावनखिंड चित्रपटाचे सादरीकरण होईल. सोमवारी (दि.2 मे) सकाळी जन्मकाळ सोहळा, मधुरिमाराजे यांच्या हस्ते होईल. सायंकाळी 5 वाजता मिरवणुकीचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.

संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सवाचे आयोजन

संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बिंदू चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.29 रोजी सायंकाळी 6 वाजता शिवमूर्तीची प्रतिष्ठापना, व पावनखिंड देखाव्याचे उदघाटन होईल. दि. 30 रोजी डॉ. अमर आडके यांचे ‘पावनखिंडीचा रणसंग्राम’ विषयावर व्याख्यान आणि 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा होईल. रविवारी (दि. 1 मे) सायंकाळी 7 वाजता विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार समारंभ तसेच रात्री 8 वाजता, चौंडेश्वरी महिला मंडळाच्या 70 कलाकारांचे ‘शिवरायांची शौर्यगाथा’ या नाटकाचे सादरीकरण आणि आतषबाजी होईल. सोमवारी (दि. 2 मे) सकाळी साडेनऊ वाजता, शिवजन्मकाळ सोहळा आणि दुपारी 4 वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Back to top button