अंबाबाई मंदिरात पुजारी व सेवेकरी नियुक्तीबाबत मंत्रालयात बैठक | पुढारी

अंबाबाई मंदिरात पुजारी व सेवेकरी नियुक्तीबाबत मंत्रालयात बैठक

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरमधील महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरात पुजारी व सेवेकरी नियुक्तीची प्रक्रिया प्रत्यक्षात आणण्याबाबत बुधवारी विधि व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. अधिनियम २०१८ या कायद्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्तव्यवस्था कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व्यवस्थापन समितीने केलेली पूर्वतयारी, पूजारी भरती व प्रशिक्षण तसेच अंबाबाई समितीकरीता आवश्यक मनुष्यबळ व कार्यालयीन इमारत याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या चर्चेनुसार विश्वस्तव्यवस्था कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून प्रस्ताव अंतिम मान्यता व अंमलबजावणीसाठी विभागामार्फत सादर करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

दैनंदिन पुजाविधी, नवरात्रोत्सवातील विधीवत पूजांच्या प्रशिक्षणासाठी देवस्थान व्यवस्थापन समितीने तात्पुरते पुजारी नियुक्तीसाठी दिलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने पुढील निवडप्रकिया देवस्थान व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येईल. तसेच तीर्थक्षेत्र विकास निधीतून मंदिर विस्तारीकरण व सभोवतालच्या परिसराचे सौंदर्यीकरण कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन करणार आहे.

तर तिर्थक्षेत्रांना साजेसे बांधकाम व दर्जेदार कामांच्या निधीसाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली जाईल. विधि व न्याय विभागाचे उप विधि सल्लागार-नि-उप सचिव ए. बी. होडावडेकर, कक्ष अधिकारी सुनिता साळुंखे, देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सचिव शिवराज नाईकवाडे आदी बैठकीस उपस्थित होते.

हे वाचलंत का? 

Back to top button