कोल्हापूर विमानतळवरील नाईट लँडिंगची तयारी पूर्ण | पुढारी

कोल्हापूर विमानतळवरील नाईट लँडिंगची तयारी पूर्ण

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगची तयारी पूर्ण झाली आहे. डीजीसीएकडून पाहणी झाल्यानंतर ही सुविधा सुरू होणार आहे. नव्या अ‍ॅप्रनचेही काम पूर्णत्वास आले असून, जून-जुलै महिन्यांपासून एकाच वेळी पाच विमानांचे पार्किंग करता येणार आहे.

1930 मीटरची धावपट्टी तयार

विमानतळावर यापूर्वी 1370 मीटरची धावपट्टी होती. ती वाढवून 2300 मीटर इतकी केली जाणार आहे. त्याचे काम सुरू आहे. विमानतळ प्राधिकरणाकडे जितकी जमीन उपलब्ध होती, त्यानुसार सध्या 1930 मीटरपर्यंत धावपट्टी विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या धावपट्टीची पाहणी झाल्यानंतर तिचा वापर सुरू होणार आहे. दरम्यान, अतिरिक्‍त 64 एकर जागेचा प्रश्‍न सुटला आहे. त्यामुळे उर्वरित कामही सहा महिन्यांत पूर्ण होईल.

नाईट लँडिंगची तयारी पूर्ण

विमानतळावर नाईट लँडिंगसाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 1930 मीटर धावपट्टीवर ही सुविधा दिली जाणार आहे. याबाबत असणार्‍या अडथळ्यांकरिता 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, धावपट्टीवरील विद्युत यंत्रणेची आवश्यक ती सर्व कामे पूर्ण झाली असून, त्याच्या चाचण्या सुरू आहेत. याचा अहवाल डीजीसीएला पाठविण्यात येणार आहे.

धावपट्टीचे रिकारपेटिंग, स्ट्रेथनिंग पूर्ण

नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणानुसार धावपट्टीचे रिकारपेटिंग करण्यात आले आहे. यासह धावपट्टीच्या नाईट लँडिंगसाठी आवश्यक मजबुतीकरणही (स्ट्रेथनिंग) पूर्ण झाले आहे. संरक्षक जाळीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

अ‍ॅटोमेटिक वेदर स्टेशन कार्यरत

विमानतळावर अ‍ॅटोमेटिक ऑल टाईम वेदर स्टेशन कार्यरत झाले आहे. यामुळे हवामानाची प्रत्येक क्षणाची सर्व माहिती आपोआप उपलब्ध होणार आहे. याचा मोठा फायदा विमानाच्या दळणवळणावर होणार आहे.

पहिला टप्पा पार

कोल्हापूर विमानतळाला 14 डिसेंबर 2021 रोजी डे लाईटिंग आयएफआर परवाना मिळाला आहे. यामुळे कमी व्हिजिबीलिटीतही विमानाचे टेक् ऑफ आणि लँडिंग करता येणार आहे. यामुळे कोल्हापूर विमानतळावरून रात्री सात वाजून 10 मिनिटांनी एका विमानाचे टेक् ऑफ झाले. नाईट लँडिंगचा परवाना मिळाल्याने पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

Back to top button